महत्वाच्या बातम्या

 वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी महामंडळासाठी शासनाकडे मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करून वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी अनमोल पाटील यांनी तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्याकडे निवेदन सादर केले.

वृत्तपत्र विक्रेते हे प्रसारमाध्यमांच्या वितरण व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत. पहाटेपासून ऊन, पाऊस आणि थंडीची तमा न बाळगता ते नागरिकांच्या घरापर्यंत वृत्तपत्रे पोहोचवतात. मात्र, नियमितपणे आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या या विक्रेत्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. या महामंडळाच्या अंमलबजावणीमुळे विक्रेत्यांच्या हितासाठी आवश्यक कल्याणकारी योजना राबविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी वृत्तपत्र विक्रेते निलकंठ मजगवळी, गौतम नाग,नरेश मुंदडा सह आदी उपस्थित होते.






  Print






Related Photos