महत्वाच्या बातम्या

 रब्बी हंगामासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ सिंचन प्रकल्पांतून ८,१६२ हेक्टर क्षेत्राचे नियोजन


- डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापासून पहिली पाणीपाळी; सात मध्यम आणि दोन लघु प्रकल्पांचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चंद्रपूर पाटबंधारे विभागाने महत्त्वपूर्ण नियोजन केले आहे. विभागांतर्गत सात मध्यम आणि दोन लघु अशा एकूण नऊ सिंचन प्रकल्पांमधून ८ हजार १६२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रकल्पांची पहिली पाणीपाळी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापासून सुरू होणार असून, काही प्रकल्पांत दुसरी पाणीपाळी जानेवारी महिन्यात, तर उर्वरित प्रकल्पांमध्ये उपलब्ध जलसाठ्यानुसार देण्यात येणार आहे.

प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठा, सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचनासाठी उपलब्ध होणारे पाणी विचारात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील पिकांना वेळेत पाणी मिळावे आणि शेतकऱ्यांना पेरणी व पिकांच्या व्यवस्थापनाचे नियोजन करता यावे, हा यामागील उद्देश आहे.

वरोरा तालुक्यातील तीन प्रकल्पांतून ३,६९८ हेक्टर क्षेत्राला सिंचन -
वरोरा तालुक्यातील पोथरा नाला मध्यम प्रकल्पातून १ हजार ८०० हेक्टर, लाल नाला मध्यम प्रकल्पातून १ हजार १५१ हेक्टर, तर लभानसराड मध्यम प्रकल्पातून ७४७ हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. या तिन्ही प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पहिली पाणीपाळी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात देण्यात येणार आहे. दुसरी पाणीपाळी प्रकल्पांतील पाण्याच्या उपलब्धतेनुसार निश्चित केली जाणार आहे.

चारगाव, अमलनाला आणि पकडीगुड्डम प्रकल्पांतून ३,०३३ हेक्टर क्षेत्राचे नियोजन -

वरोरा व भद्रावती तालुक्यांतील चारगाव मध्यम प्रकल्पातून ९१४ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. राजुरा व कोरपना तालुक्यांतील अमलनाला मध्यम प्रकल्पातून १ हजार ९० हेक्टर, तर कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम मध्यम प्रकल्पातून १ हजार २९ हेक्टर क्षेत्रासाठी पाणीपाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या तिन्ही प्रकल्पांमधून पहिली पाणीपाळी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात देण्याचे नियोजन आहे. चारगाव प्रकल्पातून दुसरी पाणीपाळी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात देण्यात येणार आहे. अमलनाला आणि पकडीगुड्डम प्रकल्पांमधून दुसरी पाणीपाळी उपलब्ध जलसाठ्याच्या स्थितीनुसार निश्चित केली जाणार आहे.

डोंगरगाव प्रकल्पातून १,२३० हेक्टर क्षेत्राला पाणी -
राजुरा तालुक्यातील डोंगरगाव मध्यम प्रकल्पातून १ हजार २३० हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाची पहिली पाणीपाळी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात देण्यात येणार असून, दुसरी पाणीपाळी पाण्याच्या उपलब्धतेनुसार निश्चित केली जाणार आहे.

दोन लघु प्रकल्पांतून १९८ हेक्टर क्षेत्राला सिंचन -
वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक लघु प्रकल्पातून १०८ हेक्टर, तर भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द लघु प्रकल्पातून ९० हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे. या दोन्ही लघु प्रकल्पांमधून पहिली पाणीपाळी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात देण्यात येणार आहे. दुसरी पाणीपाळी उपलब्ध पाण्यानुसार दिली जाणार आहे.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचन आवर्तने -
सिंचनासाठी निश्चित करण्यात आलेले क्षेत्र हे संबंधित प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठा आणि प्रत्यक्ष सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर आधारित आहे. त्यामुळे नियोजित पाणीपाळ्यांमध्ये प्रकल्पातील जलसाठा, पाण्याची उपलब्धता आणि शासनाच्या प्रचलित नियमांनुसार आवश्यक बदल होऊ शकतात. प्रत्यक्ष पाणीपुरवठा याच बाबी विचारात घेऊन करण्यात येणार आहे.

संबंधित सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आणि लाभधारकांनी नियोजित पाणीपाळ्यांची नोंद घेऊन त्यानुसार रब्बी पिकांचे नियोजन करावे. सिंचनाच्या वेळापत्रकाबाबत अधिक माहिती किंवा आवश्यक मार्गदर्शनासाठी संबंधित पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रपूर येथील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. या नियोजनामुळे नऊ सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, पिकांच्या नियोजनालाही दिशा मिळणार आहे.





  Print






Related Photos