महत्वाच्या बातम्या

 जोगीसाखरा परिसरात २५ रानटी हत्तींचा धुमाकूळ : पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त, ११ शेतकऱ्यांचे पीक नष्ट


- २२ ऑगस्टच्या मध्यरात्री शंकरनगर भागात हत्तींचा हैदोस; सोलर शॉक कुंपणही ठरले निष्प्रभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : परिसरात रानटी हत्तींचा उपद्रव पुन्हा एकदा वाढला असून, २२ ऑगस्टच्या मध्यरात्री सुमारे २५ रानटी हत्तींच्या कळपाने शंकरनगर भागात तुफान धुमाकूळ घातला. हत्तींच्या या हैदोसात सुशिक्षित बेरोजगार युवकाने स्वयंरोजमंजेवाडा जंगलाला लागून असलेल्या शेतात उत्तम गोलदार या युवा बेरोजगाराने स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या उद्देशाने पोल्ट्री फार्म उभारला होता. मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या या व्यवसायातून रोजगाराचे साधन निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, २२ ऑगस्टच्या मध्यरात्री अचानक २५ हत्तींचा कळप या परिसरात दाखल झाला. हत्तींनी पोल्ट्री फार्ममध्ये प्रवेश करून शेड, उपकरणे आणि इतर साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे फार्मचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गोलदार यांच्यावर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवले आहे.

२०२१ मध्येही याच फार्मची केली होती तोडफोड -
विशेष म्हणजे २०२१ मध्येही रानटी हत्तींच्या कळपाने याच पोल्ट्री फार्ममध्ये घुसून मोठे नुकसान केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा हत्तींच्या हल्ल्यामुळे फार्म उद्ध्वस्त झाल्याने आत्मनिर्भर होण्यासाठी धडपडणाऱ्या उत्तम गोलदार यांना मोठा आर्थिक धक्का बसला आहे. वारंवार होणाऱ्या हत्तींच्या उपद्रवामुळे व्यवसाय उभारणीचे प्रयत्न अडचणीत येत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

११ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची तुडवातुडव -
पोल्ट्री फार्मची तोडफोड केल्यानंतर हत्तींच्या कळपाने परिसरातील शेतांमध्ये धुडगूस घातला. उभ्या असलेल्या मका आणि धान पिकांमध्ये हत्ती घुसल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस झाली. तारापत गोलदार, कालिपद गोलदार, सुकुमार गोलदार, उत्तम मंडल, सुधीर मंडल, कृष्णापद मिस्त्री, शंकर मिस्त्री, विप्रो शहा, कपिल शहा, सशान सरकार आणि संतोष मंडल** यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

पिके हातातोंडाशी आलेली असताना हत्तींच्या कळपाने केलेल्या तुडवातुडवीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे.

१० ते १५ हजार रुपये खर्च करूनही संरक्षण निष्फळ -
रानटी हत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून १० ते १५ हजार रुपये खर्च करून शेताभोवती सोलर शॉक मशीन अर्थात झटका कुंपण बसवले होते. हत्ती शेतात प्रवेश करू नयेत, यासाठी शेतकऱ्यांनी हा उपाय केला होता. मात्र, रानटी हत्तींनी या झटका कुंपणालाही न जुमानता थेट शेतात प्रवेश करून उभ्या पिकांची नासधूस केली.

हत्तींच्या सततच्या उपद्रवामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेती पडीक ठेवण्यास सुरुवात केली आहे. शेती करूनही पिके हत्तींकडून नष्ट होत असल्याने उत्पादन खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

वनविभागाकडून घटनास्थळी पाहणी -

हत्तींच्या हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोल्ट्री फार्म तसेच नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. हत्तींच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात आली.

दरम्यान, वनविभागाने नुकसानीचा निष्पक्ष पंचनामा करून उत्तम गोलदार यांच्यासह नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. वारंवार होणाऱ्या हत्तींच्या उपद्रवामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने दिलासा देण्याची गरज आहे.

हत्तींच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी -

जोगीसाखरा परिसरात रानटी हत्तींकडून सातत्याने होत असलेल्या नुकसानीमुळे नागरिक आणि शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. पिकांचे नुकसान होण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी उभारलेल्या व्यवसायांनाही हत्तींच्या उपद्रवाचा फटका बसत आहे. त्यामुळे केवळ नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा हत्तींचा शेती व मानवी वस्त्यांकडे होणारा वावर रोखण्यासाठी वनविभागाने प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

रानटी हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर होत चालला असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos