जुनोना परिसरात दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई : ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू तस्करीला आळा घालण्यासाठी बल्लारपूर पोलिसांकडून ग्रामीण भागात कारवाईची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत जुनोना परिसरात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारूसह सुमारे ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मैदास मारोती मारकवार ३९ वर्ष रा. बेंबाळ, ता. मूल, ह.मु. जुनोना, चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. २१ सप्टेंबर रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक गोपनीय माहितीच्या आधारे जुनोना परिसरात कारवाईसाठी गेले होते. बाबुपेठ, चंद्रपूरकडून जुनोना गावाच्या दिशेने काळ्या रंगाच्या मोपेडवरून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी जुनोना ते बाबुपेठ जंगल परिसरातील मुख्य मार्गावर हनुमान मंदिराजवळ नाकाबंदी केली. यावेळी संशयित काळ्या रंगाच्या ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक मोपेडवरून येताना आढळून आला. त्याची झडती घेतली असता वाहनाच्या डिक्कीत ९० एमएलच्या देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीच्या १०० बाटल्या, तसेच वाहनाच्या समोरील पायदानावर प्लास्टिकच्या पिशवीत आणखी १०० बाटल्या आढळून आल्या. एकूण २०० बाटल्यांची किंमत ८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ओला कंपनीची इलेक्ट्रिक मोपेड, अंदाजे ७५ हजार रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली. दारूसह वाहन असा एकूण ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदेश वाघमारे, पोलीस हवालदार राकेश मेंढे आणि पोलीस अंमलदार अंकुश बुरांडे यांच्या पथकाने केली.




Petrol Price




