महत्वाच्या बातम्या

 आदिवासींचा गौरवशाली इतिहास व संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार


- जनजातीय गौरव दिनाच्या उपक्रमात सहभागी व्हा; मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने १५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठीच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त यंदा राष्ट्रीय स्तरावरील मुख्य कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार असून, राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जनजातीय गौरव दिनानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान राज्यात सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे. यामध्ये आदिवासी बांधवांना आधारकार्ड, विविध प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सुमारे ५०० आश्रमशाळा आणि ४९१ वसतिगृहांच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, एक हजार विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.

वनहक्क आणि पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, बिरसा कला संगमच्या माध्यमातून पारंपरिक कला व संस्कृतीला प्रोत्साहन, तसेच ६८ हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून आदिवासी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावरही शासनाचा भर आहे. कातकरी, कोलाम, माडिया आणि पारधी समाजासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज राबविण्यात येत आहे. भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून त्यांच्या विचारांचा जागर करावा आणि जनजातीय गौरव दिनासह सेवा सप्ताहातील विविध उपक्रम, शासकीय योजनांची शिबिरे व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री डॉ. उईके यांनी केले.





  Print






Related Photos