दुष्काळ सदृष्य सर्व जिल्ह्यात बैठका घेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


-  प्रक्रिया पूर्ण करुन ३१ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  औरंगाबाद  :
औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा केवळ 5 6 टक्के पाऊस  पडला असून 65 मंडळांपैकी 29 मंडळांमध्ये 50 टक्कयांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. याशिवाय मराठवाड्यातील संभाव्य दुष्काळ सदृष्य परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थिती असलेल्या सर्व जिल्ह्यात जाऊन बैठका घेऊन दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांना गती देण्यात येईल असे प्रतिपादनही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विविध बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या  पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
   पुढे बोलताना श्री. फडणवीस म्हणाले की, 1350 गावांपैकी 1330 गांवे नजर आणेवारीमध्ये कमी असल्याचे आढळून आले आहे. आगामी काळात पाऊस जर पडला नाही तर जिल्ह्यातील अनेक गांवांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते या दृष्टिनेही प्रशासनाने योग्य ते नियोजन केलेले आहे. खरीपाच्या 7.74 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 6.60 लाख हेक्टर पाण्याच्या अभावामुळे बाधित झाले आहे. हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 85 टक्के एवढे आहे.  केंद्र सरकारच्या दुष्काळ निकषानुसार अत्यंत शास्त्रीय पध्दतीने याचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रीया करुन 31 ऑक्टोबर पर्यंत टंचाईची स्थिती घोषित करुन सर्व उपाय योजना सुरू करण्यात येतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
  जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीबाबत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 10 हजार घरकुलांचे उद्दिष्ट्य देण्यात आलेले होते. यापैकी 6 हजार घरे पूर्ण झाली आहेत. उर्वरित घरे मार्च अखेर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शहरी भागासाठी 3194 चे उद्दिष्ट्य असून उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे  3700 अर्ज प्राप्त झालेले आहेत. या योजनेत किमान उद्दिष्ट असून कमाल उद्दिष्टाची कोणतीही अट नसल्याने त्याप्रमाणे नियोजन करावे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना पट्टेवाटप करुन कच्चे घर असणाऱ्यांना पक्के घर देण्याची योजना देखील शासन राबवत असल्याने पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचे निर्देश दिलेले आहेत. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मागील वर्षी 193 गावापैकी 176 गावांची कामे पूर्ण झालेली आहेत. 2018-19 मध्ये 304 गावांचा समावेश असून त्यातील 50 टक्के गावांचे काम पूर्ण झालेले आहेत. गाळमुक्त धरण योजनेत मागच्या वर्षी 140 धरणातील गाळ काढण्यात आला आहे. यावर्षी 500 धरणाचे नियोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मागेल त्याला शेततळ्यामध्ये जिल्ह्याने अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. 10208 शेततळी पूर्ण झाली असून अजून 10 हजार शेततळ्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळ्याचे काम झालेले आहे त्या भागात दुष्काळी परिस्थितीत नक्कीच संरक्षित सिंचन मिळाल्यामुळे फळबागांना जीवनदान मिळाले आहेअसेही ते म्हणाले.
  जिल्ह्यात 575 पाणी पुरवठा योजना विविध योजनांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्या असून  काम प्रगती पथावर आहे. यावर्षी नवीन 126 योजना राबविण्यात येणार आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत तीन लाख 71 हजार लाभार्थ्यांना 1872 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात 700 किलोमीटरचे रस्ते मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 560 रस्त्यांचे काम सुरू असून 140 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे मार्च अखेर पूर्ण होतील. जून 2019 पर्यंत संपूर्ण् 700 किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्यात येतील. बळीराज संजीवनी योजनेअंतर्गत  पाच लघुसिंचन प्रकल्प सिंचन मंजूर केलेले होते. या प्रकल्पांचे भूसंपादन पुढील तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शहरातील रस्त्यांसाठी शासनाने 100 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. याची निविदा प्रक्रीया  झालेले असून नोव्हेंबर पर्यंत काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत 100 बसेसचा प्रस्ताव महानगर पालिकेने केलेलेा आहे. यासोबतच अजून 50 इलेक्ट्रिक बसेससाठी शासन निधी देईल. या बसेस स्मार्ट पध्दतीने चालल्या पाहिजे यासाठी बस स्टॉपवर असणाऱ्या नागरिकांना डायनॅमिक पध्दतीने बसबाबत माहिती मिळणे गरजेचे आहे. समांतर पाणी पुरवठ्याबाबत योग्य ठराव करुन तो   सर्वोच्च न्यायालयात सादर करणयचे निर्देश आयुक्तांना दिलेले आहेत. या योजनेसाठी वाढीव निधी देण्याची शासनाची तयारी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 कायदा व सुव्यवस्थेबाबत बेालताना मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील गुन्हे सिध्दीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. छोट्या गुन्ह्यांच्या  उकल करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत कारण सामान्य माणसामध्ये यामुळे सुरक्षिततची भावना तयार होईल. मोक्का अंतर्गत गुन्हे सिध्दीचे प्रमाण अधिक असल्याने गुन्हेगारांवर जरब बसते यावरही भर देण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.   Print


News - Rajy | Posted : 2018-10-10


Related Photos