अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ग्रामीण पोलिसांची कारवाई

- पांढराबोडी येथे ट्रॉलीसह १ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी कारवाई करीत १ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० ते ४.३० वाजताच्या सुमारास पांढराबोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ करण्यात आली. पोलिसांना पांढराबोडी परिसरातून ट्रॅक्टरद्वारे अवैधरीत्या रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांचे पथक परिसरात लक्ष ठेवून होते. दरम्यान, निखिल ब्रिजलाल भुरे २२ वर्षे रा. पांढराबोडी हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने रेतीची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र, ट्रॉलीच्या डाव्या बाजूचे चाक पंक्चर झाल्याने त्याने ट्रॉली इंजिनपासून वेगळी करून रस्त्याच्या कडेला उभी केली होती.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक अंकित थॉमस सोनवाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी निखिल भुरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत चोरीच्या रेतीची अंदाजे ५ हजार ३०० रुपये किंमत असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रॉलीची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी रेती आणि ट्रॉली असा एकूण १ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार बहेकार करीत आहेत.




Petrol Price




