चंद्रपूर पोलीस दलासाठी ३० कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर पोलीस विभागाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन चंद्रपूर विकास योजनेतील पोलीस विभागासाठी आरक्षित जमिनीच्या भूसंपादनासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस दलासाठी डॉग स्क्वॉड ट्रेनिंग सेंटर, प्रशिक्षण केंद्र, पोलीस भरतीसाठी शारीरिक मैदान, बी.डी.डी.एस. प्रशिक्षण केंद्र, इनडोअर फायरिंग बट तसेच अधिकारी व अंमलदारांसाठी शासकीय निवासस्थान उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन चंद्रपूर विकास योजनेमध्ये मौजा कोसारा येथील आरक्षण क्रमांक ११० मधील ८.३० हेक्टर तसेच मौजा दाताळा येथील आरक्षण क्रमांक १३३ मधील १२.२५ हेक्टर जमीन पोलीस विभागाच्या आरक्षणाने बाधित आहे. या जमिनीचे भूसंपादन करून त्याठिकाणी पोलीस विभागासाठी विविध महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सुविधांमध्ये डॉग स्क्वॉडच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र केंद्र, पोलीस भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणीचे मैदान, प्रशिक्षण केंद्र, बी.डी.डी.एस. प्रशिक्षण केंद्र, इनडोअर फायरिंग बट तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी शासकीय निवासस्थानांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस दलाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन इतर आवश्यक बांधकामे व विविध योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चोवीस तास कार्यरत असल्याने त्यांना प्रशिक्षण, निवास, तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेला पूरक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला आहे. पोलीस स्टेशनच्या इमारती, कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था आणि घरकुलाच्या प्रश्नांनंतर आता प्रशिक्षण व इतर अत्यावश्यक सुविधांसाठी जमीन उपलब्ध करून देण्याच्या दिशेनेही त्यांनी पुढाकार घेतला आहे.
नवीन चंद्रपूर विकास योजनेतील कोसारा व दाताळा येथील आरक्षित जमीन भूसंपादनासाठी यापूर्वीच ४३ कोटी ६५ लाख ८३ हजार १६ रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी आता ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संबंधित शासन निर्णयानुसार भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर पोलीस दलाला आधुनिक प्रशिक्षण सुविधा, कौशल्यविकासासाठी आवश्यक केंद्रे, भरती प्रक्रियेसाठी मैदान तसेच अधिकारी व अंमलदारांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. परिणामी चंद्रपूरच्या पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्येही मोठी भर पडणार आहे.




Petrol Price




