महत्वाच्या बातम्या

 मारोतीच्या दर्शनावरून परतताना काळाचा घाला : भरधाव मोपेडच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मारोतीच्या दर्शनासाठी सायकलने गेलेल्या दोन जिवलग वृद्ध मित्रांवर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. मागून भरधाव वेगाने आलेल्या मोपेडने त्यांच्या सायकलींना जोरदार धडक दिल्याने ८३ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले. चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासोबत असलेले दुसरे वृद्धही जखमी झाले. ही घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी कारवा रोडवर बल्लारपूरकडे येताना घडली.

मृताचे नाव जवाहरसिंग गरमबहादूरसिंग विश्वकर्मा (वय ८३), रा. पंडित दीनदयाल वार्ड, बल्लारपूर)असे आहे. तर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मारोती वातुजी उईके (वय ६५) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, मारोती उईके आणि जवाहरसिंग विश्वकर्मा हे दोघे मागील सुमारे ५० वर्षांपासून दर शनिवारी कारवा रोडवरील मारोतीच्या दर्शनासाठी सायकलने जात होते. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दोघेही आपापल्या सायकलीने दर्शनासाठी गेले होते. दुपारी सुमारे दीड वाजता दर्शन आटोपून ते बल्लारपूरकडे परतत होते.

यावेळी उईके यांची सायकल पुढे, तर विश्वकर्मा हे त्यांच्या मागे सायकल चालवत होते. बल्लारपूरकडे येताना टर्निंगपूर्वी मागून भरधाव वेगाने आलेल्या काळ्या रंगाच्या मोपेडने विश्वकर्मा यांच्या सायकलीला जोरदार धडक दिली. त्यानंतर मोपेडची धडक उईके यांनाही बसली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात विश्वकर्मा यांच्या नाकातून व कानातून रक्तस्राव झाला. ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते. उईके यांनी स्वतःला सावरत जखमी मित्राला रस्त्याच्या कडेला आणले. त्यानंतर विश्वकर्मा यांच्या मुलाला फोन करून घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच त्यांचा मुलगा घटनास्थळी पोहोचला आणि जखमी विश्वकर्मा यांना उपचारासाठी बल्लारपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुमारे पाच दशकांपासून दर शनिवारी एकत्रितपणे मारोतीच्या दर्शनाला जाणाऱ्या दोन मित्रांच्या या प्रवासाला झालेला हा दुर्दैवी शेवट परिसरात हळहळ व्यक्त करणारा ठरला.

अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोपेडचा क्रमांक एमएच ३४ बीवाय ९१२ असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मोपेड चालकाचे नाव ओम प्रदीप राऊत, रा. बल्लारपूर, असे समजल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. मोपेड चालकाने वाहन हयगयीने, निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून अपघात घडविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी नोंद घेत पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत करीत आहे.





  Print






Related Photos