भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतला दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / दिल्ली :
  भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे साहित्यिक, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी ते ९३ वर्षांचे होते.  वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी ५. ०५  मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे.
जनता पक्षाच्या प्रयोगानंतर फाटाफूट झालेल्या जनसंघापासून ते केंद्रात भाजपाच्या पहिल्या सरकारचे पंतप्रधान असा वाजपेयांचा राजकीय प्रवास झाला. त्यांनी तीनवेळा पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली. संघपरिवारातील भारतीय जनता पक्षाच्या उभारणीतील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. कृष्णबिहारी वाजपेयी व कृष्णादेवी वाजपेयी यांचे ते पुत्र होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ९३ वर्षीय वाजपेयी हे ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल होते. श्वसनत्रास होऊ लागल्याने आणि मूत्रपिंडाशी संबंधित विकारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या २४ तासांपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होते. अखेर गुरुवारी त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
किशोरवयात असताना त्यांनी स्वातंत्र्यलढढ्यात सहभाग घेतला व ते तुरुंगात गेले. काही काळ त्यांनी कम्युनिस्ट विचारप्रणालीलाही जवळ केलं. परंतु नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले व शेवटपर्यंत संघपरिवाराचा अतूट हिस्सा राहिले. जनसंघासाठी काम करण्यापूर्वी संघाच्या मासिकासाठी काम करण्यासाठी त्यांनी १९५० मध्ये शाळा सोडली व नंतर त्यांची राजकीय मुळे संघात पक्की झाली. अटलबिहारी वाजपेयी हे तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते. १९९८ मध्ये ते केवळ तेरा दिवस पंतप्रधान होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे सरकार १३ महिने टिकले. त्यांची तिसरी पंतप्रधानपदाची कारकिर्द मात्र पूर्ण मुदतीची होती. मे १९९८ मध्ये अमेरिकेसह विकसित देशांचा रोष पत्करून पोखरण येथे अणुचाचण्या करण्यामागे पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती.
तसेच अत्यंत कसोटीच्या अशा कारगिलच्या युद्धाच्यावेळीही वाजपेयीच पंतप्रधान होते. अत्यंत कसोटीच्या या युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानला अत्यंत प्रतिकूस परिस्थितीत धूळ चारली आणि तेव्हापासून गेल्या १९ वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताविरोधात तशा प्रकारची लढाई करण्याची हिंमत दाखवलेली नाही.
वीरश्रीयुक्त काव्य असो वा देशभक्तींनं ओथंबवलेली गीतं असोत, इन्सानियतीला जास्त महत्त्व देत काश्मीरचा प्रश्न प्रेमानं सोडवण्याची घातलेली साद असो वा पाकिस्तानशी सौहार्दाचे संबंध ठेवण्यासाठी सुरू केलेली लाहोर बस किंवा समझोता एक्स्प्रेस असो, त्याचप्रमाणे रग रग से हिंदू हूँ म्हणणारा हिंदुत्ववादाचा हुंकार असो वा सर्व धर्माच्या नागरिकांना समान वागणूक देणारा राजधर्म पाळण्याचा सर्वधर्मसमभावाचा विचार असो अटल बिहारी वाजपेयी जीवनाच्या प्रत्येक सतरावर अग्रणी राहिले आणि आप्तेष्टांसह विरोधकांचंही प्रेम त्यांनी मिळवले. वाजपेयींच्या निधनानं भारतीय जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करण्यात येत आहे.  Print


News - World | Posted : 2018-08-16


Related Photos