महत्वाच्या बातम्या

 अड्याळमध्ये घरपोच गॅस सेवा पुन्हा सुरू


- अनेक महिन्यांच्या मागणीला यश; वेळ व वाहतूक खर्चाची बचत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : अड्याळ येथील ग्राहकांची अनेक महिन्यांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बंद असलेली घरपोच गॅस सिलिंडर वितरण सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सेवा बंद असल्याने ग्राहकांना गॅस एजन्सीपर्यंत जाऊन सिलिंडर आणावा लागत होता. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच शेतकरी कुटुंबांची मोठी गैरसोय होत होती. शिवाय सिलिंडर आणण्यासाठी अतिरिक्त वाहतूक खर्चही ग्राहकांनाच करावा लागत होता.

घरपोच गॅस वितरण सेवा बंद असल्याची बाब लोकमतने वृत्ताद्वारे समोर आणली होती. या वृत्ताची संबंधित यंत्रणेने दखल घेत सेवा पुन्हा सुरू केली. त्यामुळे अड्याळ ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. घरपोच सेवा सुरू झाल्यामुळे आता गॅस बुकिंग केल्यानंतर सिलिंडर घरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ, श्रम आणि वाहतूक खर्च वाचणार आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्वतःचे वाहन नसलेल्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

नवीन गॅस जोडणीचा प्रश्न कायम -
दरम्यान, अड्याळ परिसरातील नागरिकांना नवीन गॅस कनेक्शन मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या केवळ दहा किलो वजनाचा मिनी गॅस सिलिंडर उपलब्ध होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, तो ग्राहकांना परवडणारा नसल्याने त्याची मागणी कमी असल्याचेही सांगण्यात येते. घरपोच सेवा नेमक्या कुणाच्या आदेशाने बंद करण्यात आली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सेवा पुन्हा सुरू झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी -
बुकिंगनंतर गॅस सिलिंडर वेळेत आणि सुरक्षितपणे ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात यावा, तसेच भविष्यात ही सुविधा पुन्हा बंद करू नये, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. नवीन गॅस कनेक्शन मिळण्यातील अडचणीही दूर करून ग्राहकांना नियमित सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.





  Print






Related Photos