महत्वाच्या बातम्या

 नागपूर येथे सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६ चे जनजागृती सत्र उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या (MSInS) पुढाकाराने सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाअंतर्गत नुकतेच नागपूर येथे जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.

 महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे (MSInS) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकांत पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती नीता औघड, आयआयएम (IIM) नागपूर, इन्क्युबेशन फाउंडेशन, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संशोधन व इनक्युबेशन फाउंडेशन (SRIF) चे प्रतिनिधी व मंत्रालयातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 वैनगंगा इनक्युबेशन फाउंडेशन येथे आयोजित विशेष संवाद सत्रात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची भूमिका आणि स्टार्टअप्ससाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सखोल चर्चा झाली. यामध्ये विशेषतः सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६, महाराष्ट्र स्टार्टअप वीक आणि महिला उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यात आली. नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, स्टार्टअप्सना शासकीय विभागांशी जोडणे आणि सामाजिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणे या प्रमुख उद्देशांवर यावेळी विशेष भर देण्यात आला. 


प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होऊन विविध शासकीय योजनांचा व उपक्रमांचा लाभ कसा घ्यावा, याबाबत उपस्थित नवउद्योजकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या आयोजनासाठी वर्धा मार्गावरील डोंगरगाव येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंटच्या वैनगंगा इनक्युबेशन फाउंडेशन होस्ट संस्थेने या कार्यक्रमासाठी स्थानिक समन्वय साधला. पात्र स्टार्टअप्स व नवउद्योजकांपर्यंत या उपक्रमांची माहिती पोहोचवून त्यांना जास्तीत जास्त सहभागासाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा मुख्य हेतू होता.

या सत्रात विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी, नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण तसेच उपक्रमाशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थितांशी थेट संवाद साधला. उद्योजक, नवउद्योजक, विद्यार्थी आणि विविध स्टार्टअप्सचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






Related Photos