महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर-बामणीत विठ्ठल-रुक्मिणी व संत नगाजी महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर-बामणी येथील साळवे लेआऊट परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत नगाजी महाराज मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १८ व १९ नोव्हेंबर रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. दोन दिवसीय या सोहळ्यानिमित्त कीर्तन, प्रवचन, ग्रंथ पारायण, मूर्ती मिरवणूक, कलश यात्रा, दिंडी-पालखी, भजन आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. पहिल्या दिवशी बजरंगबली अभिषेक व घटस्थापनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ह.भ.प. नंदूजी महाराज पुसदेकर आळंदीकर यांच्या सान्निध्यात श्री संत नगाजी महाराज विजय ग्रंथ पारायण करण्यात आले.

बल्लारपूर येथील दत्तमंदिर टेकडी परिसरातून श्री विठ्ठल-रुक्मिणी व संत नगाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक, पालखी सोहळा व कलश यात्रा काढण्यात आली. त्यानंतर आचार्य रामजी महाराज व राकेशजी बुरडकर महाराज यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. सायंकाळी रंगीत संगीत हरिपाठानंतर शिवचरित्रकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रेरणादायी कीर्तन सादर केले. दुसऱ्या दिवशी पहाटे काकडा भजन, ग्रंथ पारायणाची समाप्ती आणि दिंडी-पालखी सोहळा पार पडला. 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. प्रमोदजी पानबुडे महाराज यांच्या दहीहंडी काल्याच्या कीर्तनाने भाविकांना भक्तिरसाचा अनुभव दिला. या सोहळ्यात संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाची परंपरा सुरू करण्यासाठी योगदान देणाऱ्या स्व. नारायण मारपल्लीवार, स्व. श्यामराव वाटकर गुरूजी, स्व. डॉ. नगाजी वटाणे, स्व. महादेव वाटकर, स्व. मधुकर येसेकर, स्व. विनोद चौधरी आणि स्व. जीवनदास नागतुरे यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांचा संत नगाजी महाराज यांच्या आठव्या पिढीचे वंशज सूर्यकांत अतकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

समाजासाठी दीर्घकाळ सेवा देणाऱ्या व्यक्तींचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गेल्या चाळीस वर्षांपासून महोत्सवात सातत्याने योगदान देणारे हनुमंतराव पंदिलवार, दत्तूजी निंबाळकर, शिवशंकर दर्वे, पंढरीनाथ चौधरी, भारत नक्षीने, सुभाष जांभुळकर, रामभाऊ घुमे आणि अशोकजी इनमवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्रज्ञाताई नक्षीने, पुरुषोत्तमर नागतुरे, शंकर मत्ते आणि अंकित पालीकोंडावार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, सकल नाभिक समाज महाराष्ट्राचे समन्वयक किरण भांगे, जिल्हाध्यक्ष रवि येसेकर, अरुण चौधरी आणि ज्योतीताई लांडगे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

मंदिराच्या कळस बांधकामासाठी योगदान देणाऱ्या माहेरवाशिणींचा साडी-चोळी व हळदीकुंकू देऊन सन्मान करण्यात आला. बल्लारपूर, चंद्रपूर व बामणी येथील महिला भजन मंडळांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. धार्मिक परंपरेचे जतन करण्यासोबतच सामाजिक एकोपा, महिला सन्मान, ज्येष्ठांच्या योगदानाचा गौरव आणि संतपरंपरेचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. समारोपप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत नगाजी महाराज मंदिर समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष गणेश वनकर, संघटक प्रमुख शंकर चौधरी, सचिव देवेंद्र वाटकर, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत वाटकर, कोषाध्यक्ष अमोल राजूरकर, सहसचिव निलेश घुमे, उपाध्यक्ष सुरज नागतुरे व मिथुन हनुमंते, सल्लागार शिवशंकर दर्वे व अशोक इनमवार, शेखर श्रीवास्तव, नितीन कडुकर, रवी कोत्तागट्टूवार, पप्पू जम्पलवर, गजानन चांदेकर, मंगेश जांभुळकर, मंगेश सूर्यवंशी यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, महिला कार्यकारिणी आणि समाजबांधवांनी परिश्रम घेतले.





  Print






Related Photos