ग्रामीण मुलींना मिळणार १२ वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास


- ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाहीमध्येही सवलत, पत्रकारांना शिवशाही मोफत
- एसटीच्या विविध सवलत योजनांची व्याप्ती वाढवली
- परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई  :
एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध घटकांना प्रवास सवलत दिली जाते. या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना 12 वी पर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही सवलत 10वी पर्यंतच्या मुलींसाठी होती. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठीही सवलत लागू करण्यात आली आहे. पत्रकारांनाही आता वातानुकुलीत शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध समाजघटकांनाही एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा मंत्री श्री. रावते यांनी यावेळी केली. या विविध सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे 2 कोटी 18 लाख लाभार्थ्यांना होणार आहे.
एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध वंचित घटकांना प्रवास सवलत देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. यात प्रमुख्याने विद्यार्थी सवलत, ज्येष्ठ नागरिक सवलत, अंध-अपंगांना असलेली सवलत याचा राज्यातील लाखो घटकांना लाभ मिळत आहे. या सवलत योजनेची व्याप्ती वाढविण्याच्या प्रस्तावास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संमती मिळाली. याबद्दल मंत्री श्री. रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांचे आभार मानले आहेत.     
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा केली आहे. तसेच नवीन योजना सूरू करण्यात येत आहेत.

- अहिल्याबाई होळकर योजना - या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एस.टी.ने मोफत प्रवास सवलत लागू आहे, ही सवलत आता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थीनींकरिता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही सवलत 100 टक्के इतकी आहे. या योजनेत 10 वी पर्यंत 19.54 लाख विद्यार्थीनी तसेच 12 वी पर्यंत 24 लाख विद्यार्थीनी लाभ घेणार आहेत. यास्तव वाढीव आर्थिक भार 44 कोटी इतका असणार आहे.

-   विद्यार्थी (तंत्र व व्यावसायिक शिक्षण) मासिक पास - 1986 नंतर सुरु झालेले विविध तंत्र व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचा सवलत योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. ही सवलत 66.67 % असेल. सध्या या योजनेचे 44 लाख विद्यार्थी लाभार्थी आहेत. या निर्णयामुळे 50 लाखापेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेणार आहेत.
-  65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत ही सध्या सर्वसाधारण व निम-आराम बसेसमध्ये 50 % सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही (आसनव्यवस्था) बसमध्येही 45% सवलत लागू करण्यात येत आहे. प्रतिवर्षी कमाल 4000 कि.मी. अंतराची मर्यादा लागू केली असून वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. या योजनेचे सध्या 70 लाख लाभार्थी आहेत.
-  क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त व्यक्तींना देण्‍यात येणारी सवलत - वैद्यकिय प्रमाणपत्राच्या आधारे सर्वसाधारण बसने राज्यांतर्गत अमर्याद अंतरापर्यंत प्रवास करण्यासाठी 50 % पर्यंत सवलत लागू होती, ती सवलत आता 75 % करण्यात येत आहे. या योजनेतून 84 हजार रुग्णांना सवलत मिळत आहे.
- अधिस्विकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत- सध्या सर्वसाधारण व निमआराम बसमध्ये वर्षभर 100 टक्के प्रवास सवलत लागू आहे. आता वातानुकूलित शिवशाही (आसनी व शयनयान) बसेसमध्येही 100 टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या 2800 लाभार्थी आहेत.
-  सिकलसेलग्रस्त, हीमोफीलीया आणि एचआयव्ही बाधित रुग्ण यांना 100 % प्रवास सवलत देण्यात येत आहे.
- सध्या 100 % अपंग असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारास 50 % प्रवास सवलत आहे. आता रेल्वेप्रमाणे 65% अपंगत्व असलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या साथीदारासही 50% सवलत मिळणार आहे. या योजनेचे सध्या 80 लाख लाभार्थी आहेत.
-  कौशल्य सेतू अभियान :- ही नवीन योजना लागू करण्यात येत असून, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने माध्यमिक शालांत परिक्षा (इ. 10 वी) मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या कौशल्य सेतू अभियान योजनेमध्ये 111 प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी 66.67 % टक्के प्रवास सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या 25 हजार लाभार्थी आहेत. पुढे हे एक लाख लाभार्थी होणार आहेत.

लाभार्थ्यांना या प्रवास सवलत योजना लागू करताना आधारकार्ड संलग्न स्मार्टकार्ड देण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी लागू असलेल्या योजनांना आहे तीच सवलत पूर्वीप्रमाणे देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री श्री. रावते यांनी दिली. वरील नमूद योजनेचे एकूण लाभार्थी सुमारे 2 कोटी 18 लाख लाभार्थी या विविध योजनांचे लाभ घेणार आहेत.

पत्रकारांनी मानले मंत्री दिवाकर रावते यांचे आभार

पत्रकारांना वातानुकूलीत शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू केल्याबद्दल यावेळी उपस्थित पत्रकारांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे आभार मानले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री श्री. रावते यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप जाधव, कोषाध्यक्ष महेश पवार, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य योगेश त्रिवेदी, पत्रकार संघाचे सदस्य मारुती कंदले, नेहा पुरव, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.  Print


News - Rajy | Posted : 0000-00-00


Related Photos