कर्जाचे हप्ते गोळा केले अन् १.१७ लाख रुपये घेऊन लोन अधिकारी बेपत्ता : बल्लारपूर पोलिसांत तक्रार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मायक्रो फायनान्स कंपनीच्या ३० कर्जदारांकडून हप्त्यापोटी गोळा केलेली १ लाख १७ हजार ८३० रुपयांची रक्कम कंपनीत जमा न करता लोन अधिकारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. स्पंदना स्फूर्ती फायनान्शियल लिमिटेड कंपनीतील या प्रकरणी एरिया हेड अविनाश चंद्रशेखर रोडे यांनी २४ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश चंद्रशेखर रोडे हे स्पंदना स्फूर्ती फायनान्शियल लिमिटेड या मायक्रो फायनान्स कंपनीत एरिया हेड म्हणून कार्यरत आहेत. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, मूल आणि गडचिरोली या पाच शाखांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. कंपनीचे लोन अधिकारी कर्जदारांकडून नियमित हप्ते गोळा करून ते कंपनीत जमा करतात.
४ सप्टेंबर २०२६ रोजी बल्लारपूर शाखेतील लोन अधिकारी गौरव शेखर निधेकर हा कळमना, दहेली, धाबा आणि बल्लारपूर परिसरात कर्जदारांकडून हप्ते गोळा करण्यासाठी गेला होता. या दिवशी त्याने ३० कर्जदारांकडून एकूण १ लाख १७ हजार ८३० रुपये जमा केले. मात्र, गोळा केलेली रक्कम कंपनीच्या शाखेत जमा करण्यासाठी तो परतलाच नाही.
सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गौरव निधेकर याचा मोबाईल फोन बंद असल्याचे शाखाप्रमुख आकाश सिद्दमवार यांच्या लक्षात आले. त्यांनी सुमारे एक तास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर दुपारी १२.३० वाजता त्यांनी ही माहिती एरिया हेड अविनाश चंद्रशेखर रोडे यांना दिली. दुपारी २ वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही गौरव शाखेत परतला नाही किंवा त्याने जमा केलेली रक्कमही कंपनीकडे जमा केली नाही.
त्यानंतर गौरवच्या घरी संपर्क साधण्यात आला असता, तो घरी आला नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे शाखाप्रमुखांनी कळमना, दहेली, धाबा आणि बल्लारपूर येथे प्रत्यक्ष जाऊन संबंधित कर्जदारांकडे चौकशी केली. यावेळी कर्जदारांनी गौरव निधेकर याच्याकडे हप्त्यांची रक्कम दिल्याचे आणि हप्ता जमा कार्डवर स्वाक्षरी केल्याचे सांगितले. मात्र, गौरवचा शोध लागला नाही आणि रक्कमही कंपनीला परत मिळाली नाही.
दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी गौरव निधेकर याच्या आईने फोन करून कंपनीचे पैसे परत करण्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, अद्याप रक्कम परत मिळाली नसल्याने एरिया हेड अविनाश चंद्रशेखर रोडे यांनी २४ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कंपनीकडे जमा करण्यासाठी विश्वासाने सोपवलेली १ लाख १७ हजार ८३० रुपयांची रक्कम जमा न करता ती परस्पर घेऊन गेल्याचा आरोप लोन अधिकारी गौरव निधेकर याच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव चव्हाण करीत आहेत.




Petrol Price




