महत्वाच्या बातम्या

 शेताच्या कुंपणात सोडलेल्या वीजप्रवाहाने महिलेचा मृत्यू : शेतमालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या धुऱ्यावर उभारलेल्या तारांच्या कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची गंभीर घटना चिमूर तालुक्यातील गरडापार येथे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणाच्या चौकशीत शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शेतमालक भास्कर शित्रुक दडमल (वय ५०), रा. गरडापार, ता. चिमूर याच्याविरुद्ध चिमूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

संगीता संतोष दडमल (वय ४३) या २५ सप्टेंबर रोजी पती व मुलासोबत शेतात गेल्या होत्या. सायंकाळी त्यांचा मुलगा संचित दडमल प्रकृती अस्वस्थ असल्याने घरी परतला. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडील संतोष दडमल हे घरी परतले. मात्र संगीता घरी न आल्याने संचित व संतोष यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

शेतशिवारातील पायवाटेने जात असताना भास्कर दडमल व बालाजी नन्नावरे यांच्या शेताच्या धुऱ्यावर गवतामध्ये संगीता दडमल पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. जवळ जाऊन पाहिले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पाठविला.

प्राथमिक माहितीच्या आधारे चिमूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक ४१/२०२६ अन्वये नोंद केली होती. २६ सप्टेंबर रोजी मृतदेहाचा पंचनामा करताना संगीता यांच्या दोन्ही पायांवर विजेचा धक्का लागल्याने भाजल्याच्या जखमा आढळून आल्या. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.

पोलिसांच्या तपासात भास्कर दडमल यांच्या शेताच्या धुऱ्यावर वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लाकडी खुंट्या व लोखंडी तारांचे कुंपण उभारण्यात आल्याचे आढळले. मृतक ज्या ठिकाणी पडल्या होत्या, त्या भागातील कुंपणाचे काही साहित्य गवतामध्ये लपविलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर मुख्य विद्युत खांब असून, तेथून विद्युतपुरवठा होत असल्याचे पोलिसांच्या पाहणीत समोर आले.

उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल २९ सप्टेंबर रोजी पोलिसांना प्राप्त झाला. अहवालानुसार संगीता दडमल यांचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचे नमूद आहे. त्यांच्या दोन्ही पायांवर विजेच्या धक्क्यामुळे भाजल्याच्या मोठ्या जखमा असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलिसांच्या चौकशीनुसार, भास्कर दडमल यांनी वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या धुऱ्यावर असलेल्या लोखंडी तारांच्या कुंपणात विद्युतप्रवाह सोडला होता. या कुंपणाला लागूनच शेताकडे जाणारी पायवाट असल्याने तेथे ये-जा करणाऱ्या व्यक्तीला विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याची शक्यता होती. २५ सप्टेंबर रोजी शेतातून घरी परतत असताना संगीता दडमल यांचा या कुंपणाला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी शेतमालक भास्कर शित्रुक दडमल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिमूरचे ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण करीत आहेत.





  Print






Related Photos