महत्वाच्या बातम्या

 रब्बी हंगामात खत खरेदीची नवी कसरत : ऑनलाइन टोकनच्या नियमाने शेतकरी हैराण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : रब्बी हंगामातील पेरणीची तयारी सुरू असतानाच खत खरेदीसाठी लागू करण्यात आलेल्या नव्या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता खत खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.

अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसणे, ऑनलाइन प्रक्रिया हाताळण्याचे ज्ञान नसणे आणि टोकन मिळाल्यानंतर अवघ्या ७२ तासांत खत उचलण्याची अट यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. खत मिळवण्यासाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याने या डिजिटल व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

नव्या प्रणालीअंतर्गत खत खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आणि तो आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, गट क्रमांक, पीक आणि आवश्यक खताचा प्रकार निवडून ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागते. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मोबाईलवर क्यूआर कोड किंवा टोकन प्राप्त होते. या टोकनच्या आधारे ७२ तासांच्या आत संबंधित दुकानातून खताची उचल करणे बंधनकारक आहे. काही कारणास्तव या मुदतीत खत घेणे शक्य न झाल्यास पुन्हा नव्याने बुकिंग करावे लागते.

ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्याने किंवा ऑनलाइन नोंदणी, आधार पडताळणी आणि बुकिंगची प्रक्रिया समजत नसल्याने त्यांना मुलांवर, नातेवाईकांवर अथवा खत विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. शेतीची कामे सोडून ऑनलाइन प्रक्रियेसाठी मदत शोधावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही खर्च होत आहेत. डिजिटल व्यवहारांची सवय असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया सोपी असली, तरी ग्रामीण भागातील डिजिटल सुविधांची मर्यादा लक्षात घेता सर्वांना ती सहज हाताळता येत नाही.

पीकनिहाय खताच्या उपलब्धतेबाबतही चिंता -
जमिनीच्या क्षेत्रफळानुसार खताचे वाटप निश्चित होणार असल्याने प्रत्यक्ष पीकनिहाय गरज पूर्ण होईल का, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. विशेषतः मका पिकासाठी युरिया आणि डीएपी खताची अधिक आवश्यकता असते. क्षेत्रफळाच्या निकषानुसार ठरविलेल्या मर्यादेत आवश्यक खत उपलब्ध न झाल्यास पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खतवाटपात पारदर्शकता आणणे, साठेबाजी व गैरव्यवहाराला आळा घालणे आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत खत पोहोचविणे हा डिजिटल प्रणालीमागील उद्देश असू शकतो. मात्र, या प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ऑनलाइन प्रक्रियेत अडचण येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुलभ पर्याय, मार्गदर्शन आणि आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे. डिजिटल सुविधा शेतकऱ्यांच्या हिताची ठरण्यासाठी तिची अंमलबजावणी ग्रामीण भागातील वास्तवाचा विचार करून करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.





  Print






Related Photos