शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी कोयनगुडा शाळेची मोहीम

- दोन दुकानदारांना नोटीस; विद्यार्थ्यांनीही तंबाखूविक्री बंद करण्यासाठी घातली भावनिक साद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शाळेचा परिसर तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशाने भामरागड तालुक्यातील कोयनगुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांना विक्री बंद करण्याचे आवाहन करण्यात आले असून, मुख्याध्यापकांनी त्यांना नोटीसही बजावली आहे. या मोहिमेत शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांनीही दुकानदारांना तंबाखूविक्री बंद करण्यासाठी भावनिक आवाहन केले.
शासनाच्या नियमानुसार शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. तसेच, शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यासाठी निर्धारित ११ निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. कोयनगुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यापैकी बहुतांश निकष पूर्ण केले आहेत. मात्र, शाळेच्या परिसरातील दोन दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याने शाळा तंबाखूमुक्त करण्याच्या प्रयत्नांत अडथळा निर्माण होत होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास मडावी आणि मुख्याध्यापक विनीत पद्मावार यांनी संबंधित दुकानदारांची भेट घेतली. शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करून शाळेला तंबाखूमुक्त करण्याच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यासंदर्भात दुकानदारांना नोटीस बजावून विक्री थांबविण्याची सूचना करण्यात आली.
या मोहिमेत विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवत दुकानदारांना तंबाखूविक्री बंद करण्याची भावनिक साद घातली. शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवता यावे आणि शाळेभोवती आरोग्यदायी वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करण्याबरोबरच परिसरातील तंबाखूविक्री बंद करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले आहेत. या उपक्रमातून शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे.
या वेळी तालुका संघटिका निळा किन्नाके उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळेच्या परिसरातील तंबाखूविक्री बंद करण्यासाठी कोयनगुडा शाळेने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.




Petrol Price




