जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागांतर्गत स्वच्छता अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यरत ५ बालगृहांमध्ये ०२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
अभियानादरम्यान बालगृहांमध्ये विविध रचनात्मक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये परिसराचे धुरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या टाकीची व स्वच्छतागृहांची स्वच्छता, हॅन्डवॉश व सॅनिटायझरची उपलब्धता, वाहत्या पाण्याची सुनिश्चिता, सेफ्टी कॅन आणि संस्थांची नियमित स्वच्छता, तसेच कपड्यांची धुलाई करण्यात आली. बालकांची वैयक्तिक स्वच्छता राखण्यासोबतच आरोग्य तपासणी शिबिरही राबविण्यात आले.
पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत संस्थेमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली व जैविक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून कचऱ्याचे प्रभावी संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट लावण्यात आली. टाकाऊ साहित्यापासून कलात्मक शिल्पे व उपयुक्त वस्तू तयार करणे, हस्तकला उपक्रम राबवणे आणि भिंतींवर पेंटिंगद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
श्रमदान, कार्यालयीन जागेचे सुशोभीकरण तसेच उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सफाई मित्रांचा सन्मानही या काळात करण्यात आला. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती आणि चाईल्ड हेल्पलाईन या बाल संरक्षण यंत्रणांचे विशेष सहकार्य लाभले. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.




Petrol Price




