कोटमी येथे सशस्त्र पोलिस दुरक्षेत्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वनजमीन वळती करण्यास शासनाची मान्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये पोलिस मदत केंद्रे, पोलिस दुरक्षेत्र निर्माण करण्यात येत आहे. एटापल्ली तालुक्यातील कोटमी येथे सशस्त्र पोलिस दुरक्षेत्राच्या बांधकामासाठी जमीनीचा प्रश्न होता. अखेर महसूल व वनविभागाने २ हेक्टर वनजमीन वळती करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच पोलिस दुरक्षेत्राचे बांधकाम करण्यात येणार आहे. 
सशस्त्र पोलिस दुरक्षेत्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर राखीव वनजमीन वळती करण्याबाबत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नागपूर यांनी शासनाला प्रस्ताव सादर केला होता. भारत सरकारच्या आदेशानुसार राज्यांना दिलेल्या अधिकाराचा वापर करून सदर जमीन वळती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 
वनक्षेत्राचा वैधानिक दर्जा बदलणार नाही, प्रस्तावामध्ये ज्या प्रयोजनासाठी वनजमीन मागीतलेली आहे त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रयोजनासाठी वनजमनीचा वापर करता येणार नाही, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, सुधारित दरानुसार नक्त वर्तमान मुल्याची रक्कम अदा करावी लागेल, प्रकल्पाचे काम करताना मजूर व इतर कर्मचाऱ्यांकडून  वनक्षेत्रातील वनस्पती, प्राण्यांना कोणतीही हानी पोहचणार नाही या जबाबदारी प्रकल्प यंत्रणेची राहिल अशा विविध अटींच्या अधीन राहून सदर प्रस्तावास मंजूरी देण्यात आली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-30


Related Photos