शरीराला प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधून गांजाची तस्करी : मध्य प्रदेशातील दोघे जेरबंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : पोलिसांची नजर चुकविण्यासाठी शरीराला प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजा बांधून त्याची वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन व्यक्तींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेलटोली परिसरात रेल्वेस्थानकाजवळ रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गांजा, मोपेड आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचून कारवाई -
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रेलटोली परिसरात अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत होते. यावेळी रेल्वेस्थानक परिसरातून दोन व्यक्ती दुचाकीवरून गांजाची अवैध वाहतूक करून विक्रीसाठी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीची दखल घेत पोलिसांनी रेल्वेस्थानक ते विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. काही वेळातच त्या मार्गाने मोपेडवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गोमाजी भागन चौधरी ५२ वर्षे आणि लक्ष्मीचंद बघेले ५२ वर्षे दोघेही रा. शिवणघाट, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश अशी नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडील सामानाची तपासणी केली.
शरीराला बांधून केली गांजाची वाहतूक -
पोलिसांची नजर चुकवून गांजाची वाहतूक करता यावी, यासाठी आरोपींनी शरीराला प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजा बांधून ठेवल्याचे समोर आले. या प्रकारामुळे अवैध अमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पद्धतीचा उलगडा झाला. पोलिसांनी गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मोपेड ताब्यात घेतली. या कारवाईत १ लाख ४५ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा, २० हजार रुपये किमतीची मोपेड आणि २ हजार ५०० रुपये किमतीचे इतर साहित्य, असा एकूण १ लाख ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल -
या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध अमली पदार्थविषयक एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गांजा कोठून आणण्यात आला होता, तो कोणाला विक्रीसाठी नेला जात होता आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याबाबत तपासाच्या अनुषंगाने माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकात सहायक पोलिस निरीक्षक अमरदीप खाडे, सहायक फौजदार राजू मिश्रा, हवालदार तुलसीदास लुटे, महेश मेहर, प्रकाश गायधने, पोलिस शिपाई राकेश इंदूरकर, कुणाल बारेवार, निखिल मेश्राम आणि चालक शिपाई राम खंदारे यांचा समावेश होता. अवैध अमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.




Petrol Price




