महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत तक्रार निवारण दिनासह अंमली पदार्थविरोधी जनजागृती


- ड्रग फ्री कॅम्पसअंतर्गत ५०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; १४० हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : माओवादासह विविध आव्हानांचा सामना करत असताना गडचिरोली पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक जनजागृती आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. केंद्र सरकारच्या नशा मुक्त भारत २०४७ अभियानाच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने शनिवारी (१९) शहरातील कारमेल हायस्कूलमध्ये ड्रग फ्री कॅम्पस संकल्पनेअंतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. याच दिवशी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले.

५०० विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन -
कारमेल हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या अंमली पदार्थविरोधी मार्गदर्शन कार्यशाळेला शाळेतील सुमारे ५०० विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर तसेच कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या विविध परिणामांची माहिती देण्यात आली.

अंमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात अंमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचे आढळल्यास त्याची माहिती तत्काळ शिक्षक किंवा पोलीस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अंमली पदार्थांच्या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या उज्ज्वल भवितव्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अंमली पदार्थांची समस्या ही व्यक्तीपुरती मर्यादित न राहता कुटुंब आणि समाजावरही परिणाम करणारी गंभीर समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

निरोगी शरीर, व्यसनमुक्त जीवन आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे आणि आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाचे व समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कारमेल हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर मेल्जो चेरीयन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सायबर फ्रॉडपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच गुड टच-बॅड टच याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

तक्रार निवारण दिनाला १४० हून अधिक नागरिकांची उपस्थिती -
दरम्यान, पोलीस स्टेशन गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस १४० हून अधिक नागरिक उपस्थित होते.

नागरिकांनी मांडलेल्या विविध तक्रारी आणि समस्यांची पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष दखल घेत संबंधित अधिकारी व अंमलदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यावर यावेळी भर देण्यात आला.

उपलब्ध माहितीनुसार, १३ वरिष्ठ अर्जांपैकी ५ तक्रारींचा बैठकीदरम्यान निपटारा करण्यात आला. उर्वरित ८ प्रलंबित प्रकरणांमध्ये पुढील सात दिवसांत चौकशी करून आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करणे अथवा कायदेशीर निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच २३ स्थानिक अर्जांपैकी ७ प्रकरणांचा बैठकीदरम्यान निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारींची पुढील सात दिवसांत चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय ९ नवीन तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये प्राप्त झाल्या.

तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यास प्राधान्य देण्यात आले. कोणत्याही प्रकारची अडचण अथवा समस्या असल्यास नागरिकांनी ती थेट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी केले.

व्यापारी असोसिएशनकडून पोलीस अधीक्षकांचा सत्कार -
गडचिरोली शहरातील सराफा दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कारवाई केल्याबद्दल व्यापारी असोसिएशनच्या वतीने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

ऑल हॅन्ड्स मिटमधून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या -
दरम्यान, पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ऑल हॅन्ड्स मिट या उपक्रमांतर्गत स्वतंत्र बैठक घेण्यात आली. पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदारांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, समस्या तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर आवश्यक तोडगा काढण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली.

पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.

अधिकारी, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती -
या विविध उपक्रमांना पोलीस अधीक्षक एम. रमेश, सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, पोलीस स्टेशन गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण तसेच कारमेल हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर मेल्जो चेरीयन यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांची उपस्थिती होती.

अंमली पदार्थांविरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी थेट संवाद अशा विविध स्तरांवर एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे पोलीस प्रशासन आणि समाजातील संवाद अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला.





  Print






Related Photos