नागपूर महानगरपालिकेचा कर संग्राहक १ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


- घराच्या जमाबंदी रेकॉर्डसाठी मागितली होती २ हजारांची लाच; तडजोडीनंतर १ हजार रुपये स्वीकारताना कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : घराच्या जमाबंदी रेकॉर्डची माहिती देण्यासाठी लाचेची मागणी करून तडजोडीनंतर एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या कर संग्राहकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. गौरव राजू वानखेडे (वय २५ वर्षे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो नागपूर महानगरपालिकेत कर संग्राहक म्हणून कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील ६२ वर्षीय तक्रारदार यांना त्यांच्या घराच्या जमाबंदी रेकॉर्डची आवश्यकता होती. सदर कामासाठी आरोपी गौरव वानखेडे याने तक्रारदाराकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १२ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी आरोपीने जमाबंदी रेकॉर्डची माहिती देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडीअंती एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे तपासात समोर आले.
१३ नोव्हेंबर २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यावेळी आरोपी गौरव वानखेडे याने तक्रारदाराकडून पंचांसमक्ष एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. सकाळी ११.४४ वाजता ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी सदर पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) च्या कलम ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल डी. चव्हाण व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, शासकीय कामांसाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.




Petrol Price




