कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध : आरोग्यमंत्री राजेश टोपे


- शहरातील संचारबंदी अधिक कडक करा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / औरंगाबाद कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने यावर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांच्या सहाय्याने ह्या परिस्थितीचा सामना करणे गरजेचे आहे. औरंगाबाद शहरातील सध्या असलेल्या कंटेटमेंट झोन परिसरातील आरोग्य विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना PPE kit (personal Protection Equipment) अधिकाधिक उपलब्ध करून देण्यात येतील तसेच याकामी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलीस उपायुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, उपायुक्त श्रीमती वर्षा ठाकूर, पराग सोमण, आरोग्य उपसंचालक डॉ.स्वप्निल लाळे, अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस. कुलकर्णी, घाटीतील मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ.मिनाक्षी भट्टाचार्य आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन बैठक पार पडली.
आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढील नियोजन अत्यंत बारकाईने करणे आवश्यक आहे. शहरातील मृत्यूदर पाहता प्रत्येक रुग्णांचा अभ्यास करणे आवश्यक असून तो आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने खबरदारी घ्यावी.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात याचा प्रादुर्भाव झालेला नाही ही चांगली गोष्ट आहे. शहरातील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरू असलेली संचारबंदी अधिक कडक करावी जेणेकरून नवीन रुग्णांची भर पडणार नाही. तसेच उपचारासाठी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचीही मदत घ्यावी यंत्रणेसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री शासनस्तरावरून लवकरच देण्यात येईल. त्याचबरोबर सीएसआर निधीतूनही मोठ्याप्रमाणात मदत करण्यात येईल. महापालिकेने क्वारंटाईन ठिकाणी अधिकाधिक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. शहरात कोविड रुग्णांव्यतिरिक्त इतर रुग्णांसाठी आरोग्य सेवा सुरू असाव्यात. विशेष करुन ग्रामीण भागातील दवाखाने सुरू राहतील यावर लक्ष ठेवा. खासगी डॉक्टरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, असेही टोपे म्हणाले.
बैठकीच्या सुरूवातीला महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सादरीकरणाद्वारे शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती देताना सांगितले की, शहरातील आसेफिया कॉलनी, आरेफ कॉलनी, हिलाल कॉलनी, कासलीवाल तारांगण, सिडको एन-४, एन-७, किराडपुरा, पद्मपुरा अशा हॉटस्पॉट असणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घेऊन त्यांना किलेअर्क, देवगिरी महाविद्यालय अशा ठिकाणी ठेवले आहे.  कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांच्या चाचण्या घेण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याचे यावेळी आयुक्त पांडेय यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी विभागात करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, शहरातील सर्व क्वारंटाईन ठिकाणांना मी भेटी दिल्या आहेत. सर्व ठिकाणी अत्यंत चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात येत असून मराठवाडा विभागासाठी मोबाईल एक्सरे युनिट उपलब्ध करून देण्याची मागणी केद्रेंकर यांनी केली.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर शहरात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, सध्या घाटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, घाटीतील मेडिसिन विभागामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडली तर एमजीएम तसेच धुत हॉस्पिटलमध्ये देखील रुग्णांच्या भरतीसाठी नियोजन केले असल्याचे सांगत ते म्हणाले की, शहरातील मंगल कार्यालय, मोठे सभागृह, विद्यापीठ परिसरातील हॉस्टेल्स अशा माध्यमातून शहरात २५ हजार रुग्णांची व्यवस्था होईल असे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनीही घाटीतील कोरोना टेस्ट सेंटर करीत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी शहरातील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी शाहरुख खान यांच्या माध्यमातून अडीच हजार PPE Kit मिळवून दिल्या असल्याचे यावेळी सांगितले.
  Print


News - Rajy | Posted : 2020-04-26


Related Photos