युवकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ : १९ नोव्हेंबरला गडचिरोलीत जिल्हा युवा महोत्सव


- लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, पथनाट्य व कवितालेखन स्पर्धांचा समावेश; १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागाची संधी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सन २०२६-२७ च्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कवितालेखन अशा पाच कलाप्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून आपले प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.
युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, तरुणांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करणे, हा या युवा महोत्सवाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाला यंदा विकसित भारत @२०४७ या संकल्पनेशी जोडण्यात आले आहे. याच संकल्पनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना विविध कलाप्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखविण्याची संधी दिली जाणार आहे.
१५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांना सहभागाची संधी -
या महोत्सवात १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धकांच्या वयाची गणना १७ ऑगस्ट २०२६ या तारखेनुसार करण्यात येणार आहे. वयाच्या खात्रीसाठी जन्माचा दाखला सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे इच्छुक स्पर्धकांनी नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
माय भारत पोर्टलवर नोंदणी अनिवार्य -
महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी सर्वप्रथम माय भारत (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या गुगल फॉर्ममध्ये नोंदणी करावी. कार्यालयातून प्रवेश अर्जाचा विहित नमुना प्राप्त करून तो पूर्ण भरावा. भरलेला प्रवेश अर्ज, ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जमा करणे आवश्यक आहे.
जिल्हास्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्याची संधी -
जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा कलाकारांना आणि संघांना पुढील स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. जिल्हास्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्या स्पर्धकांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी संधी उपलब्ध होईल. विभागस्तरावरील कामगिरीच्या आधारे राज्यस्तरावर, तर राज्यस्तरावरील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक स्तरावर प्रावीण्य मिळविणाऱ्या कलाकार आणि संघांना शासनाच्या वतीने रोख पारितोषिकेही प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावान युवक-युवतींसाठी आपली कला व्यापक स्तरावर पोहोचविण्याची ही महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
स्पर्धांचे नियम, प्रत्येक कलाप्रकारातील सहभागी कलाकारांची संख्या, सादरीकरणासाठी निर्धारित वेळ तसेच नोंदणी प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




