गडचिरोली शहरातील चुकीचे रस्ता दुभाजक ठरत आहेत कर्दनकाळ, टमाटर वाहून नेणारा ट्रक चामोर्शी मार्गावर पलटला


- प्राणहाणी झाल्यावर येणार का नगर परिषदेला जाग ?
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली शहरातील चारही अरूंद मार्गावर काही वर्षांपूर्वी रस्ता दुभाजक निर्माण करण्यात आले. मात्र हे रस्ता दुभाजक तयार करण्यात आल्यापासून अपघातांनाच निमंत्रण देत असून प्राणहाणी झाल्यावर नगर परिषदेला जाग येईल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दर १० ते १५ दिवसांनी रस्ता दुभाजकांवर वाहने चढत असून शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळ आज ८ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास टमाटर वाहून नेणारा ट्रक पलटला. या अपघातात चालक जखमी झाला आहे.  
एपी ०२ टीई २४४९ या क्रमांकाचा ट्रक चामोर्शी मार्गाने येत होता. दरम्यान रस्ता दुभाजकाचा अंदाज न आल्याने शासकीय विज्ञान महाविद्यालयासमोरील रस्ता दुभाजकावर टक चढला. यानंतर ट्रक उलटला. शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळ मार्ग अरूंद होतो. याच ठिकाणापर्यंत रस्ता दुभाजक तयार करण्यात आला आहे. तसेच रस्ता दुभाजक दर्शविण्यासाठी कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही. यामुळे भरधाव येणारी वाहने सरळ रस्ता दुभाजकावर चढतात. भाजपा सत्तेत येण्याआधीच्या सत्ताधाऱ्यांनी तयार केलेल्या या रस्ता दुभाजकावर आतापर्यंत शेकडो वाहने चढलेली आहेत. अनेकदा नागरिकांनी हे रस्ता दुभाजक काढण्याची मागणी करूनसुध्दा अजूनही पालिकेला जाग आलेली नाही. मागील काही दिवसांपूर्वी येथील चौरस्त्यावर हायमास्ट लाईट लावण्यात आला होता. मात्र असाच एक ट्रक रस्ता दुभाजकावर चढून थेट हायमास्टचा खांबच उडविला होता. शहरातील चारही मार्गांवर अशीच परिस्थिती असून मार्गाचे रूंदीकरण नसतानाही रस्ता दुभाजक उभारण्यात आले. तसेच रस्ता दुभाजकांची उंची कमी असल्यामुळे वाहने दूरपर्यंत रस्ता दुभाजकांवर चढून जातात. यामुळे चुकीचे रस्ता दुभाजक काढून टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-08


Related Photos