महत्वाच्या बातम्या

 विनापरवाना डीजेचा दणदणाट पडला महागात : रामनगर पोलिसांची धडक कारवाई


- ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे व प्लाझ्मा साहित्य जप्त; १२.५० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : विनापरवाना उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स तसेच कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध रामनगर पोलिसांनी धडक कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशांची आणि शासनाच्या नियमांची पायमल्ली करून डीजेचा दणदणाट सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे साऊंड सिस्टीम व प्लाझ्मा साहित्य असा एकूण सुमारे १२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना डीजे व उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा साहित्य बसवून मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तेथे उपस्थित ऑपरेटर व वाहनचालकाकडे डीजे, साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा लाईट्स वापरण्याची सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आहे का, याबाबत विचारणा केली. मात्र, संबंधितांकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण व सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत डीजे व प्लाझ्मा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच डीजे साऊंड सिस्टीम आणि उच्च क्षमतेचे प्लाझ्मा साहित्य पोलिसांनी जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (चंद्रपूर) प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकूरके यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.

सार्वजनिक शांततेचा भंग करणारे, विहित मर्यादेपेक्षा अधिक कर्णकर्कश आवाजात डीजे, साऊंड सिस्टीम किंवा प्लाझ्मा वाजविणारे तसेच विनापरवाना डीजे संचालन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा चंद्रपूर पोलिसांनी दिला आहे.





  Print






Related Photos