महत्वाच्या बातम्या

 लाभ बंद असलेल्या १ हजार १६५ शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण : पीएम किसान सन्मान निधी योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वंचित शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने व्यापक मोहिम हाती घेतली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संयुक्त ग्रामसभा आणि सुमारे ७४७ विशेष शिबिरांचे यशस्वी नियोजन करण्यात आले. या शिबिरात तीन वर्षापासून लाभ बंद असलेल्या  १ हजार १६५ शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण करुन लाभास पात्र ठरविण्यात आले.

या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. सन २०२३ पासून लाभ बंद असलेल्या १ हजार ८१० वंचित शेतकऱ्यांपैकी १ हजार १६५ पात्र लाभार्थ्यांची यशस्वी फेरपडताळणी पूर्ण झाली आहे. बँक खात्यांशी आधार जोडणीचे काम जलदगतीने सुरू असून, शेतकऱ्यांना बँक शाखांमध्ये मार्गदर्शन केले जात आहे. तसेच बायोमेट्रिक आणि मोबाईल ॲपद्वारे २८३ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. भूमी अभिलेख नोंदींमधील दुरुस्तीसाठीच्या याद्या तातडीने संबंधित तहसीलदार कार्यालयांकडे सोपवण्यात आल्या आहेत.

गावोगावी थेट बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या तांत्रिक त्रुटी आणि अडीअडचणी दूर करण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय हे शेतकऱ्यांच्या समस्या निवारणासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. या सर्व उपक्रमांचा आणि शिबिरांमधील कामगिरीचा सविस्तर अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे नियमितपणे पाठवण्यात आला असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.





  Print






Related Photos