मदतीबाबत काढलेल्या छायाचित्रांची प्रसिद्धी करू नये : जिल्हाधिकारी दीपक सिंगला


- गरजू लोकांना मदत ही प्रशासनाच्या समन्वयातूनच करावी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदीमुळे ज्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत आवश्यक आहे त्यांना विविध संस्था तसेच व्यक्ती यांचे मार्फत मदत देणे सुरू आहे. अशी मदत संस्था किंवा व्यक्ती यांनी तहसिलदार कार्यालयाच्या समन्वयातून करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी पत्राद्वारे दिले आहेत. यामध्ये ज्यांना मदत द्यावयाची आहे त्यांनी संबंधीत तहसिलदार यांना सुचित करून त्यांचे प्रतिनिधी समक्ष व तहसिलदार यांनी निहीत केलेल्या व्यक्तींनाच वाटप करावे अशा सूचना केल्या आहेत. तसेच सदर मदत वाटप करताना संबंधित संस्थेचे दोन किंवा तीन पेक्षा अधिक व्यक्ती त्याठिकाणी उपस्थित राहणार नाहित याची काळजी घेणे अनिवार्य आहे.
जिल्हयात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये या उद्देशाने संचार बंदी लागू केलेली आहे. परंतू या निर्बंधामूळे अनेक व्यक्तींवर रोजगार उपलब्ध न झाल्यामुळे उपासमारी होऊ नये म्हणून या ख-या गरजू लोकांना मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी यापुढे मदतीबाबत सामाजिक अंतर, आवश्यक इतर खबरदारी घेवून प्रशासनाच्या समन्वयातूनच मदत गरजू लोकांना पोहचविणे गरजेचे असणार आहे. 
मदतीबाबत काढलेल्या छायाचित्रांची प्रसिद्धी यापुढे करू नये . मदत मिळालेल्या व्यक्तीला असहजता वाटू नये म्हणून यापुढे कोणीही मदतीबाबतचे फोटो सार्वजनिक रीत्या प्रसिद्धीस देवू नये असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सूचना केल्या आहेत. यामध्ये गरीब गरजू लोकांना मदत ही सामाजिक बांधिलकीतून केली जात असहे. यावेळी संबंधित गरजू व्यक्तीच्या भावनांचा विचार करणेही आवश्यक आहे. याबाबत सर्व मदत करणा-या संस्था व व्यक्ती यांनी याबाबत विचार करून मदतीची छायाचित्र प्रसिद्ध करू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. कोणीही खाजगी बँक खात्यावर निधी जमा करू नये : विविध स्तरवार  गरजू लोकांना मदत म्हणून आवश्यक साहित्य वाटप केले जात आहे. यामध्ये प्रशासनाच्या असे निदर्शनास आले आहे की काही व्यक्ती स्वत:च्या बँक खात्यावर निधी जमा करणेसाठी सार्वजनिकरीत्या आवाहन करीत आहेत. अशा खाजगी खात्यावर कोणत्याही प्रकारचे सहाय्य नागरीकांना करू नये. असा निधी कोणालाही खाजगी रीत्या जमा करता येत नाही. जर कोणी असा मदत निधी स्वत:च्या बँक खात्यावर जमा करत असेल तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरीकांनी निधी स्वरूपातील मदत ही जिल्हाधिकारी, गडचिरोली या नावे किंवा मुख्यमंत्री सहायता निधी या खात्यावर जमा करणे आवश्यक आहे. वस्तू स्वरूपातील मदत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व तहसिल कार्यालयात स्विकारली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-16


Related Photos