राष्ट्रीय एकता परेडमध्ये गडचिरोलीच्या सी-६० जवानांचे शिस्तबद्ध संचलन


- गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात २०० जवानांचा सहभाग; पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गौरव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय एकात्मता, देशाची एकता आणि अखंडतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गुजरात राज्यातील एकतानगर (केवडिया) येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय एकता परेडमध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सी-६० पथकातील २०० जवानांनी दिमाखदार सहभाग नोंदविला. या राष्ट्रीय स्तरावरील भव्य परेडमध्ये शिस्तबद्ध संचलन करून गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जवानांचे गडचिरोली येथे परतल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गौरव करून अभिनंदन करण्यात आले.
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून या परेडचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या सी-६० जवानांना सहभागी होण्याची संधी मिळणे ही संपूर्ण जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या कार्यक्रमात उत्कृष्ट संचलन करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे पथक गेल्या दीड महिन्यापासून केवडिया येथे उपस्थित होते. या कालावधीत जवानांनी कठोर परिश्रम घेत शिस्तबद्ध पद्धतीने परेडचा सराव केला. नियमित सराव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमात उत्कृष्ट संचलन करीत गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावले.
गडचिरोली जिल्हा दीर्घकाळ माओवादाच्या आव्हानाला सामोरा गेलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता. मात्र, जिल्हा पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तसेच सी-६० कमांडोंच्या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली असून विकासालाही चालना मिळाली आहे. माओवादविरोधी अभियानांमध्ये सी-६० जवानांनी दाखविलेले धैर्य, शौर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा ही गडचिरोली जिल्हा पोलीस दलाची अभिमानास्पद ओळख बनली आहे.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी राष्ट्रीय एकता परेडमध्ये सहभागी झालेल्या सर्व २०० अधिकारी व जवानांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्तरावरील एवढ्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा संपूर्ण दलासाठी सन्मानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. परेडमध्ये शिस्तबद्ध सहभाग नोंदवून गडचिरोली जिल्ह्याचे नाव उंचावल्याबद्दल त्यांनी सर्व जवानांचे विशेष कौतुक केले.
गडचिरोली जिल्ह्यातील २१४ पोलीस जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले असून, अनेक जवानांनी अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या त्याग, समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्याला माओवादाच्या प्रभावातून मुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण देशपातळीवर स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. जवानांच्या या उल्लेखनीय सहभागाबद्दल समाधान व्यक्त करीत पोलीस अधीक्षकांनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, परेडमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी व जवानांनीही आपले अनुभव कथन केले. राष्ट्रीय एकता परेडमध्ये सहभागी झाल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना, संघभावना आणि देशप्रेमाची जाणीव अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल त्यांनी वरिष्ठांचे आभार मानले.
या गौरव कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, सहायक पोलीस अधीक्षक, भामरागड सागर भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा राहुल मडावी तसेच सहायक समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १८, काटोल, नागपूर येथील मंगेश शेलोटकर उपस्थित होते.
माओवादविरोधी अभियानात शौर्य, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण करणाऱ्या गडचिरोलीच्या सी-६० जवानांनी राष्ट्रीय एकता परेडमध्येही आपल्या शिस्तीचे आणि सामर्थ्याचे दर्शन घडविले. त्यांच्या या सहभागामुळे गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे.




Petrol Price




