महत्वाच्या बातम्या

 भंडारा जिल्ह्यात खत बुकिंगसाठी डिजिटल प्रणाली सुरू : शेतकऱ्यांना मोबाईलवरून खत बुकिंगची सुविधा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : शेतकऱ्यांना खत खरेदी करताना होणारा त्रास कमी करून खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी भंडारा जिल्ह्यात २२ ऑक्टोबरपासून फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (FFS) ही नवीन डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता घरबसल्या किंवा शेतातूनच मोबाईल ॲपद्वारे खतांचे बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी विक्री केंद्रांवर रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचणार आहे. या डिजिटल प्रणालीमुळे खत वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. तसेच अधिकृत प्रणालीद्वारे खतांचे वितरण होणार असल्याने बाजारपेठेतील बोगस खतांच्या विक्रीला आळा बसण्याची अपेक्षा आहे.

आधार किंवा ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीद्वारे लॉगीन -
शेतकऱ्यांना या ॲपमध्ये लॉगीन करण्यासाठी आधार कार्ड किंवा केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक अंतर्गत प्राप्त युनिक फार्मर आयडीचा वापर करता येणार आहे. फार्मर आयडीद्वारे लॉगीन केल्यास संबंधित शेतकऱ्याच्या शेतीविषयक माहितीची नोंद आपोआप उपलब्ध होईल. तर आधार कार्डद्वारे लॉगीन केल्यास शेतीविषयक माहिती स्वतः भरावी लागणार आहे.

शेतकरी व विक्रेत्यांसाठी हेल्पडेस्क -
नवीन प्रणालीचा वापर करताना शेतकरी तसेच खत विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर हेल्पडेस्क स्थापन करण्यात आले आहेत. या माध्यमातून प्रणालीच्या वापराबाबत आवश्यक मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेऊन खत बुकिंग प्रक्रिया सुलभ करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी केले आहे.





  Print






Related Photos