ओळखपत्रे सादर करून वाहन अनुज्ञप्ती प्राप्त करा


- नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन विभागाचे वाहनधारकांना आवाहन; २०२५ पूर्वीच्या बेवारस अनुज्ञप्ती नष्ट करणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : वाहनधारकांच्या पत्त्यावर वितरित न झाल्यामुळे टपालाद्वारे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे परत आलेल्या वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन नागपूर (ग्रामीण) प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या काही वाहन अनुज्ञप्ती संबंधित वाहनधारकांच्या पत्त्यावर वितरित होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे या अनुज्ञप्ती टपालाद्वारे कार्यालयाकडे परत आल्या आहेत. अशा सर्व वाहनधारकांनी आपल्या अनुज्ञप्ती प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.
दोन मूळ ओळखपत्रे सादर करणे आवश्यक -
परत आलेली वाहन अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी संबंधित वाहनधारकांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल, बँक पासबुक यांसारख्या कागदपत्रांपैकी कोणतीही दोन मूळ ओळखपत्रे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (ग्रामीण) यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय, सादर करण्यात येणाऱ्या ओळखपत्रांच्या स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
शुल्क भरल्यानंतर अनुज्ञप्तीचे वितरण -
टपालाद्वारे परत आलेल्या अनुज्ञप्ती संबंधित वाहनधारकांना आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर वितरित करण्यात येतील. त्यामुळे वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रे आणि अर्जासह कार्यालयाशी संपर्क साधून आपली अनुज्ञप्ती प्राप्त करून घ्यावी.
२०२५ पूर्वीच्या बेवारस अनुज्ञप्ती नष्ट करणार -
ज्या वाहन अनुज्ञप्तींवर संबंधितांकडून कोणताही दावा करण्यात आलेला नाही, अशा २०२५ पूर्वीच्या अनुज्ञप्ती नष्ट करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी या सूचनेची नोंद घेऊन आपल्या अनुज्ञप्तीबाबत वेळेत कार्यवाही करावी.
ही माहिती नागपूर (ग्रामीण)चे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली असून, सर्व संबंधित वाहनधारकांनी आवश्यक ओळखपत्रे, त्यांचे स्वयंसाक्षांकित छायांकित प्रती आणि लागू शुल्काची पूर्तता करून आपली वाहन अनुज्ञप्ती प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




