महत्वाच्या बातम्या

 आसरअल्ली येथे शहीद रवी चौधरी यांच्या नावाने वाचनालयाचे लोकार्पण : मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन!


- पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमातून आसरअल्लीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी; मुख्य सचिवांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत आसरअल्ली येथे शहीद रवी चौधरी यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मा. राजेश अग्रवाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात करण्यात आले.

या वाचनालयामुळे आसरअल्ली परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यास, वाचन तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

या उद्घाटनप्रसंगी गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक  योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भा.प्र.से.), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास लक्ष्मण गाडे (भा.प्र.से.) तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक  एम. रमेश (भा.पो.से.) यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच पोलीस स्टेशन आसरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि  युवराज घोडके, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक  प्रफुल भोयर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक बळीराम बुडसे, जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य सचिवांचा विद्यार्थ्यांशी संवाद; उज्ज्वल भविष्याचा दिला संदेश -
वाचनालयाच्या उद्घाटनानंतर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची व भविष्यातील ध्येयांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे, शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.

नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या -
यावेळी मुख्य सचिवांनी आसरअल्ली येथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. दुर्गम भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व विकासकामांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला.

पोलीस दलाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक -
गडचिरोली जिल्हा पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम न करता दुर्गम भागातील नागरिकांसाठी शिक्षण, आरोग्य, जनजागृती आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करीत आहे. पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे मुख्य सचिवांनी विशेष कौतुक केले.

आसरअल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन! -
शहीद रवी चौधरी यांच्या नावाने आसरअल्ली येथे सुरू करण्यात आलेले हे वाचनालय परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र ठरणार आहे. पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासोबतच त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य वातावरण मिळणार आहे. पोलीस दादालोरा खिडकी उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, जनजागृती आणि सामाजिक विकासाला चालना देण्याचा गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचा प्रयत्न या उपक्रमातून अधोरेखित झाला असून, आसरअल्लीच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद उपक्रम ठरला आहे.





  Print






Related Photos