भामरागड पंचायत समिती सभापतींच्या दौऱ्यात दोन शाळा आढळल्या बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
स्थानिक पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी दोन शाळा नेहमीच बंद राहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी  केवळ १५ आॅगस्ट रोजी शाळा उघडली गेली असल्याची माहिती नागरिकांनी सभापतींना दिली.
दुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्यात अनेक शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. यामुळे अनेक शाळा बंद राहतात. तालुक्यातील इरकडुम्मे आणि विसामुंडी येथील शिक्षक शाळेत रोज जातच नाहीत. यामुळे एकही विद्यार्थी शिक्षण घेत नाही. केवळ १५ आॅगस्ट रोजी शिक्षकांनी शाळा उघडली. याव्यतिरिक्त अद्याप शाळेत विद्यार्थ्यांनी धडे गिरवलेच नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. अधिकाऱ्यांच्या नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याला काय अर्थ, असा प्रश्न सभापतींनी उपस्थित केला आहे.

शिक्षक नेहमी शाळेत जातात का, शिक्षक मुख्यालयी राहतात काय, शिक्षक दांडी मारत असेल तर पगार रोखण्यात यावेत. आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळत नसल्यानेच ते मागे पडत आहेत. शिक्षकांना अभय देणाऱ्या केंद्रप्रमुख, संवर्ग विकास अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सुखराम मडावी यांनी केली आहे.
याबाबत गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाणे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, इरकडुम्मे येथील शिक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांचे वेतनसुध्दा रोखण्यात आले आहे. तर विसामुंडी येथील शाळा केंद्रप्रमुखांनी आढावा घेतल्यामुळे शिक्षक हजर नव्हते. यामुळे सभापतींनी भेट दिलेल्या दिवशी शाळा बंद होती. कियर येथे असलेल्या सभेला शिक्षक सकाळची शाळा घेवून पोहचले होते. विसामुंडी येथील शाळा नेहमीच सुरू राहते, अशी माहिती त्यांनी दिली. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-08


Related Photos