महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूरच्या ड्रग्ज साम्राज्यावर पोलिसांचा मोक्का प्रहार : तस्करांच्या टोळीला मोठा दणका


- अंमली पदार्थ विक्रेत्यांवर जिल्ह्यात पहिल्यांदाच MCOCA अंतर्गत कारवाई; २१ गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात अंमली पदार्थांचे जाळे पसरवून तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ढकलणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर चंद्रपूर पोलिसांनी अखेर कठोर कायद्याचा बडगा उगारला आहे. अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध जिल्ह्यात पहिल्यांदाच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा हादरा बसला असून, गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक ९८०/२०२६ मध्ये एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींवर अंमली पदार्थ तस्करीसोबतच शरीराविरुद्धच्या मारामारीसह तब्बल २१ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या टोळीतील यासीर अली उर्फ सैय्यद परवेज सैय्यद गणी (३५), वसीमखान आरिफखान उर्फ कालू (४०), नसीबखान आरिफखान उर्फ मालू (३९) आणि जुबेर करिम खान यांच्याविरुद्ध पोलिस अभिलेखावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सातत्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या या टोळीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा मार्ग स्वीकारला.

या पार्श्वभूमीवर रामनगर पोलिसांनी मोक्का कारवाईचा सविस्तर प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर केला. प्रस्तावाची छाननी करून त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ४ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) चा समावेश करण्यात आला.

अंमली पदार्थांच्या माध्यमातून शहरातील तरुणाईचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. विशेषतः अंमली पदार्थ विक्रीसोबतच हिंसक गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीवर मोक्कासारख्या कठोर कायद्याचा वापर झाल्याने भविष्यात अशा गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि त्यांच्या डी.बी. पथकातील पोलीस अंमलदारांनी केली.





  Print






Related Photos