अपघातास निमंत्रण देत आहे भामरागड - कोठी मार्ग


- १५ दिवसाआधीच उलटली होती बस
- उखडून गेलेल्या मार्गाने सुरू आहे जिवघेणा प्रवास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
तालुक्यातील अनेक गावांना जाण्यास रस्ते नाहीत. अनेक रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाहीत. मात्र ज्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले असे रस्ते बोगस कामामुळे अल्पावधीत उध्वस्त होत आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पाच ते सहा महिन्यांपूर्वी कोठी मार्गावरील  कारमपल्ली ते हेमलकसा मार्गावर २ ते ३ किमी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच हे डांबरीकरण उखडून गेले आहे. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असून १५ दिवसांपूर्वीच या मार्गावर बस उलटली होती. डांबरीकरण केल्यानंतर बाजूला मुरूम टाकून ते दाबून टाकणे आवश्यक आहे. मात्र असे केले जात नसून परिसरातीलच माती रस्त्याच्या बाजूला टाकली जात आहे. ही माती पावसामुळे वाहून जावून रस्त्याला भेगा पडत आहेत. यामुळेच रस्तेसुध्दा उखडून जावून अर्धा रस्ता वाहून गेला आहे. कारमपल्ली वळणाजवळ रस्ता वाहून गेल्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. दुसऱ्या  वाहनाला जावू देण्याच्या प्रयत्नात बसच उलटली होती. या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवितहाणी झाली नाही. रस्ता उखडून अनेक दिवसांचा कालावधी होत आहे. मात्र याकडे सबंधित विभागाने लक्ष दिलेले नाही. केवळ सहा महिन्यातच रस्ता उखडून जाण्याचे कारण काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी धोकादायक परिस्थिती दर्शविण्यासाठी एखादा फलकसुध्दा लावण्यात आलेला नाही. यामुळे मोठा अपघात होण्याआधी रस्ता दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तेलंग यांच्याशी संपर्क साधला असता सबंधितकंत्राटदाराच्या मार्फतीने लवकरच रस्त्याची दुरूस्ती केली जाईल, अशी माहिती दिली. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-23


Related Photos