महत्वाच्या बातम्या

 महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी स्मृती वर्षानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न


- विद्यार्थ्यांनी सामाजिक समता, सामाजिक न्याय व संविधानिक मूल्यांवर मांडले विचार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी स्मृती वर्षानिमित्त जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, भंडारा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक समता, सामाजिक न्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानिक मूल्ये यांवर प्रभावीपणे आपले विचार मांडले.

समाज कल्याण विभागांतर्गत कार्यरत शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा आणि अनुदानित वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या नियोजनानुसार शालेय, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा तीन स्तरांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहेत.

भंडारा येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत अनुदानित वसतिगृहांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी महाड चवदार तळे सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करत सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि संविधानातील मूल्यांचे महत्त्व आपल्या भाषणांतून अधोरेखित केले.

कार्यक्रमाला जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रशांत दखने, विशेष अधिकारी (शानिशा) विठ्ठलसिंग बलावणे, सेवानिवृत्त शिक्षक विनोद उमप, सहाय्यक लेखा अधिकारी शिवशंकर खोब्रागडे, गृहपाल योगराज सावरबांधे तसेच सोहंत रणदिवे, वैभव रामटेके, चंद्रकांत लांजेवार आणि तन्मय उके उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय सेवा पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते प्रा. युवराज खोब्रागडे, जकातदार कन्या विद्यालय, भंडारा येथील मुख्याध्यापिका रिना काळे आणि संकल्प व्यसनमुक्ती केंद्र, पिंगलाई, भंडारा येथील  रहाटे यांनी काम पाहिले.

परीक्षकांच्या गुणांकनानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपयांची पारितोषिके धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली. तसेच पदक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला आणि वैचारिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळाले. तसेच सामाजिक समता, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन मोहतुरे यांनी केले, तर निलेश गाढवे यांनी आभार मानले.





  Print






Related Photos