आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी : माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

- आष्टीचे नाव वगळण्याचा निर्णय रद्द करून मंजूर अप्पर तहसील कार्यालय तातडीने सुरू करण्याची मागणी; नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी मा.खा.डॉ. नेते यांच्यासह भाजप शिष्टमंडळाचा पुढाकार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आष्टी परिसरातील वाढती लोकसंख्या, विस्तारणारी भौगोलिक व्याप्ती, औद्योगिक व व्यापारी विकास तसेच प्रशासकीय कामकाजाचा वाढता ताण लक्षात घेता, आष्टी येथे मंजूर असलेले अप्पर तहसील कार्यालय रद्द न करता ते पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी केली आहे.
या मागणीसाठी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदन सादर केले. यावेळी आष्टी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी आणि अप्पर तहसील कार्यालयाची असलेली आवश्यकता जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सदर मागणी शासनापर्यंत योग्य प्रकारे पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्यासह शिष्टमंडळाला दिले.
आष्टी परिसरातील नागरिकांची ३५ किलोमीटरच्या प्रवासातून सुटका करा! -
सध्या आष्टी परिसरातील नागरिकांना महसूल व इतर शासकीय कामांसाठी सुमारे ३५ किलोमीटर अंतर पार करून जावे लागते. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य जनतेला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी आष्टी येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शैक्षणिक, आरोग्य व औद्योगिक विकासामुळे आष्टीचे महत्त्व वाढले! -
आष्टी हे परिसरातील महत्त्वाचे शैक्षणिक, आरोग्य, पोलीस व महसूलविषयक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पोलीस स्टेशन, महसूल मंडळ, एमएसईबी कार्यालय तसेच विविध औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि नागरिकांची वाढती प्रशासकीय कामे पाहता आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे डॉ. अशोकजी नेते यांनी स्पष्ट केले.
शासनाच्या निर्णयात आष्टीचे नाव वगळल्याने नागरिकांमध्ये नाराजी! -
सुरुवातीच्या शासन प्रस्तावात आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याबाबत तरतूद करण्यात आली होती. मात्र, २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन आदेशात आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करून आष्टीचे नाव कायम ठेवावे आणि पूर्वी मंजूर असलेले अप्पर तहसील कार्यालय तातडीने सुरू करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली.
आष्टी परिसरातील नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासकीय सुलभता आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा यावेळी डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केली. या शिष्टमंडळात माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ज्येष्ठ नेते संजय पंदिलवार, पवन रामगिरकर,से.नि.प्राचार्य दिपक रॉय सर,शरद कोलेट्टिवार,व्यंकटी बुरले,डी.एम.बारसागडे,जुगल सरकार,हरिदास मेश्राम, शंकर मार्शेटीवार,माजी सरपंच बेबि बुरांडे, विठ्ठल माचेवारजी, तसेच आष्टी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




