नेरी येथे माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाचा संकल्प

- कृती दल समितीच्या बैठकीत विविध ठराव मंजूर; स्वच्छता आणि आरोग्य जनजागृतीवर भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : गावातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण व्हावे आणि प्रत्येकाला आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेरी (मिर्जापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृती दल समितीची बैठक आयोजित करण्यात आली. ग्राम अधिकारी संजय यावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अभियान यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीत नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या, स्वच्छता आणि आरोग्य सेवा याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. गावातील सर्व जलस्रोतांची स्वच्छता व पाण्याची गुणवत्ता तपासण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यानुसार गावातील विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी करणे, पाणीपुरवठा विहिरी तसेच साठवण टाक्यांची नियमित स्वच्छता करणे आणि टी.सी.एल. पावडरच्या माध्यमातून पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले.
याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर अभियान समितीच्या नियमित आढावा बैठका घेणे, जलस्रोतांच्या स्वच्छतेसाठी विशेष नियोजन करणे आणि अभियानाच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे ठरविण्यात आले. महिला आरोग्याच्या दृष्टीने विशेष शस्त्रक्रिया पंधरवड्याच्या अनुषंगाने तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचेही निश्चित करण्यात आले.
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, तसेच पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेबाबत समुपदेशन करून अधिकाधिक पुरुषांना या शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित करण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. यावेळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून माझे गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गावाच्या सर्वांगीण आरोग्य विकासासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, कृती दल समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले.




Petrol Price




