महत्वाच्या बातम्या

 ७० वर्षीय पतीने संशयाच्या भरात पत्नीवर उगारली कु-हाड : ६५ वर्षीय महिलेचा जीव थोडक्यात बचावला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ७० वर्षीय पतीने तिच्यावर कु-हाडीने हल्ला केल्याची गंभीर घटना बल्लारपूर तालुक्यातील इटोली येथे २९ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या हल्ल्यात ६५ वर्षीय पत्नीच्या डाव्या पायाला गुडघ्याखाली गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर जीव वाचविण्यासाठी महिलेने शेजाऱ्याच्या घरात धाव घेतल्याने तिचा जीव थोडक्यात बचावला. चंद्रकला रामदास भुरसे ६५ वर्ष रा. इटोली, ता. बल्लारपूर, असे जखमी महिलेचे नाव असून रामदास लक्ष्मण भुरसे ७० वर्ष असे आरोपी पतीचे नाव आहे.

चंद्रकला भुरसे या पती, मुलग, सून आणि दोन नातींसह इटोली येथे राहत होत्या. त्यांचे घर तीन खोल्यांचे असून घरालगत सायवन आहे. मागील वर्षभरापासून मुलगा व सून घरातील खोल्यांमध्ये स्वतंत्र राहत होते, तर चंद्रकला आणि त्यांचे पती सायवनमध्ये राहत होते. पती रामदास हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी नागपंचमीच्या दिवशीही रामदास यांनी संशयातून चंद्रकला यांच्या डोक्यावर कु-हाडीने वार करून त्यांना जखमी केले होते. त्यावेळी चंद्रकला यांनी पोलिसांत तक्रार केली होती. पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे पोळ्यापासून त्या मुलगा व सुनेसह राहू लागल्या होत्या. रामदास मात्र घरालगतच्या सायवनमध्ये एकटे राहत होते.

२९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चंद्रकला या नेहमीप्रमाणे जेवण करून नातीसोबत घराच्या पहिल्या खोलीत बसल्या होत्या. त्यावेळी रामदास यांनी घराबाहेरून शिवीगाळ करीत चंद्रकला यांना बाहेर येण्यास सांगितले. आवाज ऐकून काय झाले हे पाहण्यासाठी त्या उभ्या राहिल्या असता रामदास हातात कु-हाड घेऊन घरात आले.

रामदास यांनी जीवे मारण्याची धमकी देत चंद्रकला यांच्यावर कु-हाडीने वार केला. मात्र वार चुकविण्यासाठी त्या खाली बसल्याने कु-हाड त्यांच्या डाव्या पायाला गुडघ्याच्या खाली लागली. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत चंद्रकला यांनी जीव वाचविण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. मात्र रामदास कु-हाड हातात घेऊन त्यांच्या मागे येत असल्याने त्यांनी हिरामण  पिपरे यांच्या घरी धाव घेत तेथे आश्रय घेतला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिक जमा होताच रामदास यांनी कु-हाड तेथेच टाकून घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेनंतर चंद्रकला यांच्या मुलाने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चंद्रकला यांना ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी रामदास लक्ष्मण भुरसे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), २९६ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे पुढील तपास करीत आहेत.





  Print






Related Photos