महत्वाच्या बातम्या

 भरधाव आयशर ट्रक घरावर आदळल : हडस्ती येथील घटना 


- चालक-कंडक्टर वाहन सोडून पसार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविलेला आयशर ट्रक घरावर आदळून बाथरूम व सायवनाचे नुकसान झाल्याची घटना सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती येथे घडली. या घटनेत घरमालकाचे सुमारे ६० हजार रुपये, तर दुकानाचे सिमेंटचे पोल व टिनाचे शेड तुटून ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक चालक व कंडक्टर वाहन सोडून पसार झाले. प्राप्त माहितीनुसार, संजय शालिक आंबिलकर (४२) हे सोमवारी पहाटे ते घरात झोपले असताना अचानक मोठा आवाज झाला. आवाजाने जागे होऊन घराबाहेर येऊन पाहिले असता CG 07 DC 1995 क्रमांकाचा आयशर ट्रक त्यांच्या घराच्या बाथरूम व सायवनावर आदळलेला दिसून आला.

तसेच या ट्रकने रविंद्र सखाराम बोरकर यांच्या दुकानाचे सिमेंटचे पोल व टिनाचे शेड तोडले. आंबिलकर यांनी ट्रक चालकाला थांबण्यास सांगितले असता चालकाने वाहन बाजूला लावतो, असे सांगून ट्रक रिव्हर्स घेतला आणि तेथून निघून गेला. आंबिलकर यांनी ट्रकचा पाठलाग केला असता चालकाने चारवट येथे ट्रक उभा करून चालक व कंडक्टर वाहन सोडून पसार झाले. घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांना देण्यात आली. पोलीस पाटलांनी घटनास्थळी पाहणी करून डायल ११२ वर माहिती दिली.

त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली. भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून घर व दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेत एकूण सुमारे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





  Print






Related Photos