महत्वाच्या बातम्या

 परराष्ट्र मंत्रालयाच्या नावे बनावट भरती जाहिरात : बेरोजगारांना नोकरीचे आमिष


- गडचिरोलीत खळबळ; व्हायरल जाहिरातीत भारताच्या राजमुद्रेचा अनधिकृत वापर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : बेरोजगार युवक-युवतींच्या नोकरीच्या अपेक्षेचा गैरफायदा घेत भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नावाने बनावट भरतीची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार २४ सप्टेंबर रोजी समोर आला. विशेष म्हणजे, या कथित जाहिरातीमध्ये थेट भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नाव, शासकीय चिन्ह आणि लोगोचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत असल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात समाजमाध्यमांवर वेगाने प्रसारित होत असलेल्या या जाहिरातीची जिल्हा प्रशासनानेही गंभीर दखल घेतली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जाहिरातीमध्ये अर्जंट भरती असा उल्लेख करण्यात आला असून, विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना तातडीने नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून पदवीधर, आयटीआय आणि डिप्लोमा धारकांसाठी विविध पदे उपलब्ध असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय आकर्षक वेतन, कोणताही करार नसणे, मुलींना प्रथम प्राधान्य, राहण्याची व जेवणाची सुविधा अशा विविध प्रलोभनांचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार युवक-युवतींकडून या जाहिरातीला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून, त्यातून आर्थिक फसवणूक होण्याबरोबरच वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जाहिरातीमागे नेमके कोण? -
या कथित भरती जाहिरातीमध्ये संपर्कासाठी मोबाइल क्रमांक देण्यात आला आहे. त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संबंधित व्यक्तीने कॉल स्वीकारला नाही. त्यामुळे हा मोबाइल क्रमांक नेमका कोणाचा आहे, जाहिरात कोणी तयार केली, ती सोशल मीडियावर कोणी प्रसारित केली आणि या प्रकारामागे एखादे मोठे फसवणूक रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास होणे आवश्यक आहे.

जाहिरात तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली माहिती, मोबाइल क्रमांक, सोशल मीडिया अकाउंट तसेच जाहिरात सर्वप्रथम कोणी प्रसारित केली, याचा तांत्रिक तपास केल्यास या प्रकारामागील सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

शासकीय लोगोमुळे विश्वास बसण्याची शक्यता -
या जाहिरातीतील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नाव तसेच शासकीय चिन्हाचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते. केंद्र सरकारच्या मंत्रालयाचे नाव आणि भारताची राजमुद्रा वापरल्यामुळे सामान्य नागरिकांना ही जाहिरात अधिकृत सरकारी भरतीची असल्याचा भास होऊ शकतो.

नोकरीच्या शोधात असलेले युवक-युवती अशा जाहिरातींवर विश्वास ठेवून अर्ज, नोंदणी किंवा कागदपत्र पडताळणीच्या नावाखाली पैसे भरू शकतात. त्याचबरोबर आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा इतर वैयक्तिक कागदपत्रांची माहिती मागविली गेल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

युवक-युवतींनी सतर्क राहण्याचे आवाहन -
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही सरकारी भरतीच्या जाहिरातीवर केवळ शासकीय लोगो किंवा मंत्रालयाचे नाव पाहून विश्वास ठेवू नये. संबंधित भरतीची अधिकृत माहिती संबंधित मंत्रालयाच्या किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. तसेच अनोळखी व्यक्ती किंवा क्रमांकावर पैसे पाठविणे अथवा वैयक्तिक कागदपत्रे पाठविणे टाळावे.

जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल -
गडचिरोली जिल्ह्यात व्हायरल झालेल्या या कथित बनावट भरती जाहिरातीची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बेरोजगार युवक-युवतींची दिशाभूल करून त्यांची आर्थिक किंवा वैयक्तिक फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

बेरोजगारांची दिशाभूल करणाऱ्या अशा बनावट जाहिरातींची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, गडचिरोली

दरम्यान, या जाहिरातीमागील व्यक्ती किंवा यंत्रणा कोणती, याचा तपास होणे गरजेचे असून, सरकारी यंत्रणेच्या नावाचा आणि शासकीय चिन्हाचा गैरवापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी अशा जाहिरातींपासून सावध राहून कोणताही अर्ज, शुल्क किंवा कागदपत्रे देण्यापूर्वी त्याची अधिकृत पातळीवर पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.





  Print






Related Photos