जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत गांधी विद्यालयाच्या मुलींची बाजी : विभागीय स्पर्धेसाठी निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २३ व २४ सप्टेंबर २०२६ रोजी पीएम नगरपरिषद गांधी विद्यालय, बल्लारपूर येथे जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अंडर-१७ मुलींच्या गटात पीएम नगरपरिषद गांधी विद्यालय, बल्लारपूरच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे गांधी विद्यालयाच्या मुलींच्या संघाची विभागीय स्तरावरील डॉजबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी संघात मानसी नरेश खंडागळे, हर्षिता विजय सातपुते, संबोधी मनोज पाटील, तपस्या अमरदीप ठेंगरे, स्नेहा शांताराम मडावी, हाफिजा जाकीर शेख आणि ज्योती फुलचंद वर्मा या विद्यार्थिनींचा समावेश आहे. तसेच अंडर-१७ मुलांच्या गटातून संप्रीत शंकर पुतळवार याचीही विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेच्या प्रसंगी उपमुख्याधिकारी तथा शिक्षण अधिकारी रवींद्र भंडारवार, शिक्षण सभापती प्रियंका थुलकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत कडुकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहम्मद शरीफ, किदवाई स्कूल चंद्रपूर चे क्रीडा शिक्षक शकील उपस्थित होते. नगर परिषद चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी विद्यालयचे क्रीडा शिक्षक स्वप्नील डंभारे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेची तयारी केली. खेळाडूंनी चपळता, सांघिक भावना आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले असून, विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.




Petrol Price




