ब्रम्हपुरीत कारमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक : दोघे ताब्यात, ४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी ते मालडोंगरी मार्गावर नाकाबंदी करून पोलिसांनी मारुती रिट्झ कारमधून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख २९ हजार ६०० रुपये किमतीच्या १८० मिली क्षमतेच्या ४८० सीलबंद दारूच्या बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन लाख रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी १२.२० वाजताच्या दरम्यान ब्रम्हपुरी ते मालडोंगरी जाणाऱ्या मार्गावर, ब्रम्हपुरीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर करण्यात आली.
ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याचे पथक अवैध दारू, जुगार व इतर अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गस्तीवर असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. ब्रम्हपुरी येथून मालडोंगरीकडे एका मारुती रिट्झ कारमधून दोन व्यक्ती विदेशी दारूची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाईचे नियोजन केले.
पोलिसांनी ब्रम्हपुरी ते मालडोंगरी मार्गावरील कावळे लोखंड स्क्रॅप दुकानासमोर नाकाबंदी केली. यावेळी ब्रम्हपुरीकडून सिल्वर रंगाची मारुती रिट्झ कार येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबण्याचा इशारा करून कार रस्त्याच्या कडेला थांबविली. कारची तपासणी केली असता मागील डिक्कीमध्ये दारूचे खोके आढळून आले.
या कारवाईत कन्हय्यासिंग शेरसिंग भुराणी (वय ३४) आणि किसनसिंग माधवसिंग भुराणी (वय ३५), दोघेही रा. पेठवॉर्ड, आरमोरी रोड, ब्रम्हपुरी, यांना ताब्यात घेण्यात आले. कारच्या डिक्कीत दहा खोके आढळून आले. प्रत्येक खोक्यात १८० मिली क्षमतेच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ४८ बाटल्या याप्रमाणे एकूण ४८० बाटल्या आढळल्या. त्यांची एकूण किंमत १ लाख २९ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एमएच ०१ बीएफ ३१८१ क्रमांकाची सिल्वर रंगाची मारुती रिट्झ कारही पोलिसांनी जप्त केली. कारची किंमत तीन लाख रुपये असा अंदाज नोंदविण्यात आला आहे. दारू व वाहन असा एकूण ४ लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद बानबले यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे, पोहवा मिलिंद नैताम, मुकेश गजबे, पोअं वशिष्ठ रंगारी, निलेश तुमसरे, प्रविण भिवगडे, स्वप्नील पळसपगार, इर्शाद खान यांनी केले.




Petrol Price




