भोंदुगिरी करणाऱ्या शंकर बाबाला अटक : अ.भा. अंनिस व तरुणांचा पुढाकार


-असाध्य आजार दुरस्तीचा करायचा दावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
समुद्रपूर तालुक्यातील वायगाव ( हळद्या ) येथे करणी उतरवण्यासाठी दहा हजाराची मागणी करुन न दिल्यास दैवीशक्तीने  जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अट्टल भोंदूबाबास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व गावातील युवकांनी पुढाकार घेत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी ( ता. १६ ) रात्रीस अटक करण्यात आली. 
 शंकर वरघणे उर्फ शंकर बाबा असे भोंदूबाबाचे नाव आहे. शंकर वरघणे  वरोरा तालुक्यातील लाडकी ( नागरी ) येथील रहिवाशी असून तेथील नागरिकांनी त्याच्या भोंदूगिरीला त्रासून  हाकलून लावल्याने सहा वर्षापूर्वी समुद्रपूर तालुक्यातील वायगांव ( हळद्या )  जयश्री धानोरकर ह्या भक्ताच्या घरी दरबार भरवायला सुरवात केली. गावातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्यामूळे सदर गावातील नागरिकांनी त्याला हुसकावून लावले. दोन वर्षापासून तो गावाबाहेर झोपडी उभारून दरबार भरवीत होता. दररोज शेकडो भक्त त्याच्याकडे उपचाराकरिता येत होते. देणगी रुपाने प्राप्त लाखो रुपयाची माया त्याने गोळा केली होती. २०१८ चा २० जून ला गंगाधर कळमकर प्रकृती ठीक नसल्या कारणाने सदर मांत्रिका कडे उपचाराकरिता गेला. मांत्रिकाने त्याच्यावर कोणीतरी करणी केल्याचे सांगीतले व उपचाराकरिता बाहेरून मांत्रिक बोलावण्यास दहा हजार लागतील असे सांगितले. दोन दिवसांनी गंगाधर कळमकर पुन्हा दरबारात जावून दहा हजार रुपये नसल्याचे सांगीतले.  हे ऐकताच मांत्रिक त्याच्याशी जोरजोराने भांडू लागला व दैवी शक्ती असल्याचे सांगूण मंत्राने मुठ तुला मारून टाकील अशी धमकी दिली. या घटनेनंतर मांत्रिक त्याच्या उपचाराकरिता आलेल्या भक्तांना गंगाधर कळमकर त्यांच्यावर जादूटोणा करतो असे सांगून त्यांना भडकावयाचा, मग भक्त त्याच्याशी भांडूण मारण्याचा प्रयत्न करायचे. त्रासाला कंटाळून बुधवारी ता. १३ सप्टे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे तक्रार केली. समिती चे तालुका संघटक प्रफुल कुडे व युवा तालुका संघटक संजित ढोके प्रकरणाची माहिती घेण्याकरिता ओळख न दाखवता गावातील तरुणांसह गुरुवारी ( ता१४ ) मांत्रीकाच्या दरबारात गेले. तेथे मांत्रीकाने त्याच्यात दैवी शक्ती असल्याचा व ब्लड कॅन्सर सारखे आजार दूरुस्त केल्याचा दावा केला. संपूर्ण मुलाखतीची तीस मिनिटाची मोबाईलचित्रफीत बनविण्यात आली. 
सदर मांत्रिक भोंदू असल्याची खात्री पटल्यानंतर जिल्हा संघटक पंकज वंजारे, जिल्हा सहसंघटक आकाश जयस्वाल यांच्या मदतीने गंगाधर कळमकरची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलींद पराडकर, उपनिरीक्षक माधूरी गायकवाड , संतोष जैस्वाल , आशिष गेडाम , विरेंद्र कांबळे , विनायक गोडे , विनायक खेकरे, सचिन रोकडे , रवि वर्मा  यांनी कारवाई करित मांत्रिकाला महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष , अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ या कायद्यातंर्गत अटक करण्यात आली .
 कारवाईत दरबारात धागे , अंगारा ,बिबे , वेगवेगळ्या झाडांची मुळे ,  हाडे , अनेक मृत विंचू, देशी विदेशी दारूच्या बाटल्या, सौंदर्यप्रसाधनाचे साहित्य , विविध धान्य , बदाम , होम कुंड , मोरपिसांचे झाडू , दानपेटी , रजिस्टर, डायऱ्यांमध्ये विविध लोकांची नावे , माऊली मेडीकल स्टोअर्सचे कोरे प्रिस्क्रीप्शन पेपर , १३५०० रूपये रोख , विविध बँकांचे पासबुक आदी संशयास्पद साहित्य मिळाले .शंकर बाबा दहावी नापास असून तो औषधोपचार करायचा. गावात भोंदू बाबा विरुद्ध रोष असून काही दिवसांत भोंदूबाबाचे अनेक प्रताप बाहेर येण्याची शक्यता आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मंगेश थुल, पलाश लाजूरकर , कृष्णा धुळे , प्रितम रंगारी , रवि पुनसे ,  निर्मल भोयर , नवनित गंगशेट्टीवार, उमेश पोटे , गजानन गारघाटे,अमित वासनिक , बादल वानकर ,विक्की थुल, सुरज ढोके , गौरव दोंदल ,ललित डगवार , गौरव इसपाडे व वायगाव येथील आशिष पाटील, सचिन घुमडे , पितांबर घुमडे , संजय पाटील अर्जुन बैस , महेंद्र पाटील , प्रदिप मून , कुंडलिक कुमरे , सोनु मेश्राम यांनी सहकार्य केले .  Print


News - Wardha | Posted : 2018-09-18


Related Photos