महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुरात १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान भव्य कमल दांडिया महोत्सव : २ लाख ६१ हजार रुपयांची बक्षिसे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, बल्लारपूरच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त १६, १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य कमल दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शगुन लॉनसमोरील मैदानावर हा महोत्सव रंगणार असून, स्पर्धकांसाठी एकूण २ लाख ६१ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सोलो दांडिया, कपल दांडिया आणि ग्रुप दांडिया स्पर्धा पार पडतील.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. ग्रुप दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ५१ हजार रुपये, कपल दांडिया स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना ३१ हजार रुपये, तर सोलो दांडिया स्पर्धेतील प्रथम विजेत्याला २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय विविध श्रेणींमध्ये इतर बक्षिसेही ठेवण्यात आली असून, एकूण २ लाख ६१ हजार रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.

महोत्सवासाठी आतापर्यंत ग्रुप दांडिया प्रकारात ११, कपल दांडियासाठी १२ आणि सोलो दांडिया स्पर्धेसाठी ८० स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. तसेच १२ वर्षांखालील मुलांसाठी स्वतंत्र बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महोत्सवाच्या तिन्ही दिवसांत दररोज १० ते १५ कूपन काढून प्रेक्षकांनाही बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनाही बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

नवरात्रोत्सवात देवीच्या आराधनेसह पारंपरिक दांडिया नृत्याला विशेष महत्त्व आहे. याच परंपरेला पुढे नेत कमल दांडिया महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र येऊन सांस्कृतिक उत्सव साजरा करण्याची संधी मिळणार आहे. रंगीबेरंगी रोषणाई, पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्यामुळे परिसरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे.

बल्लारपूर शहरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासोबत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली जोशी, आरती आक्केवार, जयश्री मोहुर्ले, सारिका कनकम, नगरसेविका विद्या खरतड, शालू कुमरे, वर्षा सुंचूवार, प्रतिज्ञा शेंडे, ज्योती येलमल्ला यांच्यासह भाजपाचे शहराध्यक्ष ॲड. रणजय सिंह, समीर केणे, सतीश कनकम, देवा वाटकर, घनश्याम बुरडकर आणि किशोर मोहुर्ले उपस्थित होते.





  Print






Related Photos