कोरपना येथील दोन कारवायांमध्ये १० लाख २२ हजारांचा दारूसाठा जप्त


- पाच आरोपींना केली अटक, कोरपना पोलिसांची धडक कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना पोलिस स्टेशनच्या पथकाने दोन ठिकाणी धडक कारवाई करीत १० लाख २२ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमध्ये ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर घटना शुक्रवार, २० डिसेंबर २०१९ रोजी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या दारूविक्री व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. काही इसम एका चारचाकी वाहनाने अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती कोरपना पोलिसांना २० डिसेंबर रोजी मिळाली. या माहितीवरून पोलिस पथकाने हायवे रोडवर एका अशोक लेलॅड चारचाकी वाहनास थांबविले असता वाहनात चालकासह दोन इसम होते. सदर इसमास विचारपूस करून वाहनाची झडती घेतली असता, वाहनाच्या मागील भागात २ लाख २५ हजार रुपये किंमतीचे देशी दारूचे ४५ बाॅक्स आढळून आल्याने सदर मुद्देमालासह दारू वाहतुकीकरिता वापरलेले ७ लाख रुपये किंमतीचे अशोक लेलॅड वाहन, १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ९ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मनोज नामदेव बुरांडे (३५) रा. बाबुपेठ व इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या घटनेत, कोरपना पोलिस पथकाने एका हिरो एक्सट्रीम दुचाकी वाहनास थांबविले असता ८७ हजार रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाॅटल आढळून आल्या. सदर दारूसाठा व दारू वाहतुकीसाठी वापरलेली ७० हजार रुपये किंमतीचे दुचाकी वाहन जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यात शंकर भगवान दुपारे (२७) रा. वणी, जि. यवतामळ व विजय कवडू करमनकर (२३) रा. राजुरा, जि, चंद्रपूर यांना अटक करण्यात आली. सदर कारवाई चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए. एम. गुरनुले यांच्या नेतृत्वात कोरपना पोलिस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-12-20


Related Photos