महत्वाच्या बातम्या

 लम्पी स्किन डिसीज : जिल्ह्यात आतापर्यंत ३ लक्ष १० हजार २४० जनावरांचे लसीकरण


- बाधित ११६ पैकी १०६ जनावरे रोगमुक्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत गोवंशीय जनावरांवर लंम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव निदर्शनास आला आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत उपाययोजना केल्या असून आतापर्यंत 3 लक्ष 10 हजार 240 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर बाधित 116 पैकी 106 जनावरे रोगमुक्त झाली आहेत. 10 जनावरांवर औषधोपचार सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण गायवर्गीय जनावरांची संख्या 3 लक्ष 95 हजार 914 आहे. जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 21 गावे बाधित झालेली असून आतापर्यंत  116 जनावरे लम्पी आजारामुळे बाधित झाली. यापैकी 106 पशूरुग्ण बरे झाले आहेत. 10 जनावरांवर औषधोपचार सुरू आहे. लम्पी आजारामुळे जिल्ह्यात एकही गोवंशीय जनावरांचा मृत्यु झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लक्ष 10 हजार 240 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याला आतापर्यंत 3 लक्ष 30 हजार लस मात्रा प्राप्त झाल्या असून 70 हजार लस मात्रांची आवश्यकता आहे. जनावरांचे उपचार पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत सुरू आहे. औषधसाठा पशुवैद्यकीय संस्थेत उपलब्ध आहे.

लंम्पी त्वचारोग हा औषधोपचाराने निश्चित बरा होत असून आजारी जनावरांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत बाधित व सतर्कता क्षेत्रात मोफत लसीकरण व आजारी जनावरांना मोफत औषधोपचार शेतकऱ्यांच्या दारात करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमार्फत जनावरे व गोठ्याची फवारणी प्रतिबंधक उपाय म्हणून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यासोबत संपर्क करावा.

पशुसंवर्धन विभाग व जिल्हा यंत्रणेकडून सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज आहे. आजारी जनावरे औषधोपचार करून निश्चित बरे होतात. सदर रोग हा प्राण्यांमधून मनुष्याला संक्रमित होत नसल्यामुळे जनावरांचे दूध सेवनासाठी सुरक्षित आहे. तरी, पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांमध्ये लंम्पी स्कीन डिसीज आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेसोबत संपर्क साधावा. किंवा 18002330418 अथवा 1962 या टोल-फ्री क्रमांकावर तात्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos