दोन अट्टल दुचाकी चोरटे गजाआड, दहा दुचाकी जप्त : स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर ची कामगिरी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल दुचाकी चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींजवळून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. करण रघुनाथ वाढई (२०) रा. कवठपेठ, ता. मूल, मयूर अतुल चिचघरे (१९) रा. सिंतळा, ता. मूल अशी अटकेतील दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.
चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. रोज कुठे ना कुठे दुचाकी चोरीची घटना घडत असून, वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक रविंद्र सिंह परदेशी, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना वाहनचोरी उघडकिस आणणेकरीता आदेशित केले. पोलिस निरीक्षक महेश कोडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक हे मोटार सायकल चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिग राबवीत असतांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, पोस्टे रामनगर हददीतील एम.ई.एल. चौक परिसरात एक इसम विना नंबरप्लेट व विनाकागदपत्राची मोटारसायकील विक्री करणेकरीता आलेला आहे. सदर माहितीवरुन सापळा रचून आरोपी करण रघुनाथ वाढई (२०), धंदा मजुरी, रा. कवठपेठ, ता. मुल, जि. चंद्रपुर, मयुर अतुल चिचघरे (१९), धंदा मजुरी, रा. सिंतळा, ता. मुल. जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून ४ लाख ४० हजार रू. चा मुद्देमाल ताब्यात घेवून पोस्टे रामनगर, चंद्रपुर शहर, मुल, पोंभुर्णा, मुलचेरा (जि. गडचिरोली) येथे दाखले असलेले मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्यात आले.
सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक रविंद्र सिंह परदेशी, अप्पर पोलीस अधिक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, दिनेश अराडे, पोहवा गोपाल पिंपळशेन्डे व सायबर पथकाचे प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, अमोल सावे यांनी केली.
News - Chandrapur