उन्हाळ्याच्या झळा सुसह्य होण्यासाठी काळजी घेऊया..
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : होळीला पळस फुल फुलल्यानंतर लगेच उन्हाचे चटके सुरू होतात. ग्लोबल वार्मिंगमुळे तापमानात चढ उतार होत असुन पर्यावरणाचा असमतोल ही मोठी गंभीर बाब झाली आहे. विदर्भात उन्हाळा हा प्रचंड तापतो यासाठी नागरिकांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. ऋतूंचे सोहळे साजरे करत असतांना आरोग्यांचीही काळजी घेतली पाहीजे. यावर्षीच्या उन्हाळयात उन्हापासून कशी काळजी घ्यावी याबाबत जाणून घेवूया.
सर्व आजार आणि प्रामुख्याने होणारा उष्माघाताचा त्रास आपण टाळू शकतो मात्र त्यासाठी आपल्याला थोडी काळजी घ्यायला हवी. जेव्हा वातावरणातील तापमान खूप वाढू लागते तेव्हा शक्यतोवर उन्हात बाहेर फिरणे टाळावे. विशेषत: सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जेव्हा उन्हाची तीव्रता जास्त असते. बाहेर जाण्याचे टाळणे शक्य नसल्यास मात्र खालील बाबींवर लक्ष द्यावे.
भरपूर प्रमाणात पाणी प्यावे : उन्हाळ्यात तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. तहान लागण्याची वाट न पाहता दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, कांजी, निंबूपाणी तसेच ओआरएस पावडर घ्यावी अथवा जवळ बाळगावीत. जास्त प्रमाणात साखरेचे वा अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेली पेये घेऊच नयेत त्यामुळे खरोखराच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. तसेच बाहेरील थंड पेये घेणे टाळा ज्यामुळे पोटपेटके सुरू होतात. निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम आवश्यकच आहे. मात्र व्यायाम करताना थोडी जास्त काळजी घ्यावी त्यामध्ये सामान्यतः २४ औंसचे द्रवपदार्थ व्यायामाच्या दोन तास आधी घ्यावेत. व्यायाम सुरू करण्यापूर्वी ८ औंस द्रवपदार्थ प्यावे.
खाण्याच्या सवयी : ताजी फळे तसेच फळभाज्यांचा वापर करावा. गरम तसेच जड अन्नपदार्थ टाळावेत. कारण ते शरीराचे तापमान वाढवतात. टरबूज, द्राक्षे, अननस, गाजर व काकडी खावी. कच्चा कांदा जेवणात असल्यास उत्तम. जेवणामध्ये गरम मसाले, लालपावडर व मिरची मसाले वापरणे शक्यतो टाळावे. कारण त्यामुळे शरीराची गरमी वाढण्यास हातभार लागतो. तसेच तेलकट व तिखट खाणे टाळावे.
घालावयाचा पेहराव : शक्यतोवर हलके, फिकट रंगाचे सैल कपडे परिधान करावे. गडद रंगाचे कपडे घालू नये. जमल्यास पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. कारण गडद रंग तुलनेने जास्त उष्णता शोषून घेतो. जमल्यास टोपी किंवा स्कार्फ वापरावा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल्स वापरावेत.
त्वचेची घ्यावयाची काळजी : त्वचा सजलित ठेवावी तसेच मॉइश्चराझरचा वापर करावा. जर बाहेर जावेच लागले तर स्कार्फ (मुली) तर टोपी (मुले) चा वापर करावा. छत्रीचा वापर करावा. सनस्क्रीन लोशन (Sun Protective Factor) बाहेर जाण्यापूर्वी तीस मिनिटे आधी लावावे. तसेच ते पॅकेटवरील दिलेल्या सूचनेबरहुकूम वापरत राहावे.
वास्तुशास्त्रीय सावधगिरी : दारे व खिडक्या बंद ठेवावीत. घरातील पडदे गडद रंगाचे नसावेत. खिडक्यांच्या काचा गडद रंगाच्या असाव्यात. म्हणजे सूर्यप्रकाश आतमध्ये येणार नाही. खिडक्या रात्री उघड्या ठेवाव्यात आणि घरात हवा खेळती ठेवावी. घराच्या आजूबाजूला झाडे असावीत, हिरवळ असावी जेणेकरून वातावरण थंड राहण्यास मदत होते.
डासांच्या उपद्रवासंबंधी घ्यावयाची काळजी : डासांची प्रजनन ठिकाणे म्हणजे घरातील व बाहेरील सांडपाणी तुंबून राहिलेली ठिकाणे, घरातील कुंड्यांमधील पाणी यासारखी ठिकाणे स्वच्छ ठेवावीत. पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. डासांना दूर ठेवण्यासाठीच्या (Repellents) औषधांचा, स्प्रेचा वापर करावा. जेणेकरून डासांपासून प्रादुर्भाव होणारे आजार टाळता येतील.
- पाण्यात होणाऱ्या जतूंचा प्रादुर्भाव आणि त्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी यावयाची काळजी
- पाश्चराइज्ड दूध आणि उकळलेले पाणी वापरावे. यामुळे पाण्यातील जंतू उष्णतेमुळे नष्ट होतात.
- हात स्वच्छ धुवावेत.
- घरात शिजवलेले अन्नपदार्थ खावेत.
- शिळे अन्न खाऊ नये.
- लहान मुलांना शक्यतोवर बाटलीमधून दूध देऊ नये.
- उन्हाळ्यात होणारे काही आजार व त्यांची कारणे
■ उष्णतेमुळे होणारे आजार : उष्माघात, सतत होणाऱ्या उलट्या, नाकातून होणारा रक्तस्राव आणि सूर्यप्रकाशातील उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी
■ त्वचेवरील परिणाम : सूर्यप्रकाशामुळे होणारा त्वचेचा क्षोभ, त्वचा काळवंडणे, अकाली वृद्धत्व
■ डोळ्यांवरील परिणाम : मोतीबिंदू, डोळ्यांचा दाह, रेटिनाला होणारे नुकसान
■ डासांमुळे होणारे आजार : डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनिया
■ पाण्यामुळे होणारे आजार : अतिसार, आमांश, विषमज्वर, कॉलरा, कावीळ, यकृतावरील सूजण, जंताचा प्रादुर्भाव
उष्माघात : उन्हाळ्यामध्ये साधारणतः सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात होय. यालाच उन्हामुळे येणारी तिरमिरीदेखील म्हणतात. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची देखील शक्यता असते.
धोक्याचे घटक :
- उष्माघात हा प्रामुख्याने वयोवृद्ध पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करण्याऱ्या लोकांमध्ये जास्त प्रादुर्भावाने आढळतो.
- अर्भके व चार वर्षापर्यंतची लहान मुले, पासष्टीच्या पुढील वृद्ध मंडळी यांना उष्माघाताचा त्रास अधिक सहजपणे होऊ शकतो.
- तसेच हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींना देखील उष्माघाताची लागण सहज होऊ शकते.
News -